तुमच्या घराजवळ रिक्षावाला फिरतोय? तर मग सावधान! नाशिक पोलिसांच्या कारवाईनंतर समोर आला धक्कादायक प्रकार, काय घडलं?
नाशिक शहरात गेल्या काही महिन्यांपासून जबरी चोरीच्या घटनेत वाढ झाली होती. त्यानंतर नाशिकच्या अंबड पोलिसांनी केलेल्या कारवाईत धक्कादायक बाब समोर आली आहे. दरम्यान पोलिसांचे कामगिरीनंतर कौतुक होत आहे.
नाशिक : तुमच्या घराजवळ जर रिक्षावाला फेऱ्या मारत असेल तर सावधान. कारण नाशिक पोलिसांनी उघडकीस आणलेल्या गुन्ह्यामध्ये धक्कादायक बाब समोर आली आहे. विशेष म्हणजे दहाहून अधिक गुन्हे उघडकीस आले असून तब्बल 20 हून अधिक लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. यामध्ये नाशिक शहर पोलिसांच्या पथकाने केलेल्या या कारवाईत धुळ्यातील टोळीला गजाआड करण्यात आले असून त्यातील एक शहरातील पंचवटी येथे राहत होता. चोऱ्या, घरफोडी यांसारख्या गंभीर गुन्ह्यांची उकल करण्यात आली आहे. अंबड पोलिस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने ही कारवाई केली आहे. त्यामध्ये मूळचा धुळे येथील राहणारा आणि सध्या पंचवटी येथे राहणारा हेमंत उर्फ सोन्या मराठे हा रिक्षाचालक आहे. तो विविध भागांमध्ये फिरत असतांना रेकी करून बंद असलेल्या घरांची माहिती गोळा करून धुळे येथील सहकाऱ्यांना देत होता. त्यानंतर चोरीसाठी प्लॅन केला जात होता.
अंबड पोलिसांना याबाबत माहिती मिळाली होती. धुळे येथील टोळी नाशिकमध्ये येऊन रात्रीच्या वेळी चोरी करून निघून जाते. त्यावरून अंबडच्या गुन्हे पथकाने सापळा रचत हेमंत उर्फ सोन्या किरण मराठे आणि धुळ्यातील अहमद मोहमंद सलीम अन्सारी या दोघांना अटक केली.
त्यानंतर त्यांचे चोरीतील साथीदार शाकिर बम इब्राहिम शहा, तौसिफ ऊर्फ मामू अजीज शहा, समीर सलीम शहा, इस्माईल ऊर्फ मारी अहमद शेख आणि वसीम जहिरुद्दीन शेख याना अटक केली आहे. त्यानंतर कसून चौकशी केल्यानंतर दहाहून गुन्हे आत्तापर्यन्त उघडकीस आले आहे.
खरंतर गेल्या काही महिन्यांमध्ये नाशिक शहरात जबरी चोरीचे अनेक गुन्हे घडत होते. त्याची उकल करण्यात अंबड पोलिसांना यश आले आहे. त्यामध्ये तब्बल 20 लाखांहून अधिकचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. त्यामुळे नाशिक पोलिसांच्या धडक कारवाईचे स्वागत केले जात आहे.
हे गुन्हे उघडकीस आल्यानंतर यामध्ये रिक्षाचालक असलेला व्यक्ती रेकी करून धुळ्यातील सहकाऱ्यांना माहिती देऊन चोऱ्या, घरफोडी असे प्रकार करत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या प्रकरणात आणखी गुन्हेगार पोलिसांच्या हाती लागण्याची शक्यता असून काय कारवाई होते हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.