Crime : नेरूळमधील दोन रिअल इस्टेट एजंट्सच्या हत्येचा खुलासा, पोलिसांकडून 5 जणांना अटक
नेरूळमधील दोन रिअल इस्टेट एजंटची हत्या झाली होती. या हत्येचा पोलिसांनी उलगडा केला आहे. दोघेही गायब झाले होते, पोलिसांनी पथके तयार करत या प्रकरणाचा उलगडा केला. नेमकं काय घडलं होतं ते जाणून घ्या.
नवी मुंबईमधील नेरूळ येथील दोन रिअल इस्टेट एजंट्सच्या हत्येच्या प्रकरणात नवी मुंबई पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली आहे. हे प्रकरण जमिनीच्या खरेदी-विक्रीच्या व्यवहारात आर्थिक वादामुळे हत्या केल्याचा खुलासा पोलिसांनी बुधवारी केला. या प्रकरणात विठ्ठल बबन नाकाडे (४३), जयसिंग उर्फ राजा मधु मुदलीयार (३८), आनंद उर्फ एंड्री राजन कुज (३९), विरेंद्र उर्फ गोया भरत कदम (२४) आणि अंकुश उर्फ अंक्या प्रकाश सितापुरे उर्फ सिताफे (३५) या पाच जणांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास नेरूळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ब्रह्मानंद नाईकवाडी करीत आहेत.
क्राइम ब्रांचचे डीसीपी अमित काले यांनी सांगितले की, २१ ऑगस्ट रोजी नेरूळ येथे राहणारे रिअल इस्टेट एजंट अमिर खानजादा आणि सुमित जैन हे प्रॉपर्टी डीलच्या कामासाठी गाडीतून निघाले होते. मात्र, ते घरी परतले नाहीत, त्यामुळे गुरुवारी त्यांच्या गायब झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली. या दरम्यान पोलिसांनी गाडीला बसवलेल्या जीपीएसच्या साहाय्याने ती खोपोली येथे अवस्थेत आढळून आली. गाडीत खूनाचे पुरावे आणि दोन रिकाम्या काडतुसे सापडली, त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला.
तपासासाठी पोलिसांच्या दोन परिमंडळांतील आठ पथके तयार करण्यात आली होती. पथकाने तपास करून पेन पोलीस हद्दीत सुमित जैनचा मृतदेह ताब्यात घेतला. तपासात सुमित जैन याची गोळी मारून हत्या केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांनी सोमवारी पाचही आरोपींना अटक करून बुधवारी कर्नाळा अभयारण्यातून अमिर खानजादा यांचा मृतदेह जप्त केला. प्राथमिक तपासात सुमित जैन, अमिर खानजादा आणि आरोपी विठ्ठल नाकाडे यांच्यातील जमिनीच्या व्यवहारात आर्थिक वादामुळे ही हत्या झाल्याचे समोर आले आहे