मुलाचा पहिला वाढदिवस, घरी तयारी सुरु होती, पण वाढदिवसाचं सेलिब्रेशन सुरु होण्याआधीच संपलं, काय घडलं नेमकं?
मुलांचा पहिला वाढदिवस म्हणून घरात उत्साह होता. वाढदिवसाच्या निमित्ताने घरी पूजा आयोजित केली होती. सर्व नातेवाईक घरी जमले होते. मात्र हा आनंद फार काळ टिकू शकला नाही.
आग्रा : उत्तर प्रदेशातील आग्रा येथे काळीज पिळवटून टाकणारी घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे एका कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पहिल्या वाढदिवशी एका निष्पाप मुलाचा वेदनादायक मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. खेळता खेळता मुलगा उकळत्या भाजीच्या कढईत पडला. यात गंभीर भाजल्याने मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला. आग्रा येथील कागरोल शहरात ही हृदय पिळवटून टाकणारी घटना आहे. या घटनेमुळे घरातील आनंदाचे शोकात रुपांतर झाले आहे. मुलाचा पहिलाच वाढदिवस शेवटचा ठरल्याने नातेवाईकांनाही अश्रू अनावर झाले आहेत.
वाढदिवसानिमित्त पूजा आणि मेजवाणीचे आयोजन केले होते
कागरोल शहरातील विनोद यांना गेल्या वर्षी एक मुलगा आणि एक मुलगी अशी जुळी मुले झाली. सोमवारी 9 मे रोजी या जुळ्यांचा पहिला वाढदिवस होता. वाढदिवसानिमित्त घरात पुजेचे आयोजन केले होते. पुजेसाठी आणि वाढिवसाच्या सेलिब्रेशनसाठी अनेक नातेवाईक घरी जमले होते. नातेवाईकांसाठी मेजवाणीचे आयोजन करण्यात आले होते.
खेळता खेळता मुलगा उकळत्या भाजीत पडला
आचारी मोठ्या कढईत भाजी बनवत होता. तेवढ्यात एक वर्षाचा मुलगा खेळता खेळता तेथे पोहचला आणि उकळत्या भाजीच्या कढईत पडला. यानंतर एकच कल्लोळ माजला. मुलाचा ओरडण्याचा आवाज ऐकून लोकांनी धाव घेत मुलाला कढईतून बाहेर काढले. मुलाला तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. उकळत्या भाजीत पडल्याने मुलगा गंभीर जखमी झाला होता. त्याला रुग्णालयात नेले पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. डॉक्टरांनी मुलाला तपासून मृत घोषित केले.