सुशिक्षित तरुणी सायबर फसवणुकीची बळी; ऑनलाईन व्यवहारात बसला ‘हा’ फटका
सुशिक्षित लोकांना गंडा घालण्याचे धाडस सायबर गुन्हेगार करीत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये प्रचंड भितीचे वातावरण पसरले आहे.
मनोज गाडेकर, TV9 मराठी, अहमदनगर : सध्या ऑनलाईन फसवणुकीला पेव फुटले आहे. सर्वसामान्य नागरिकांना ऑनलाईन व्यवहाराचे पुरेपूर ज्ञान नसते. त्याचा सायबर गुन्हेगार गैरफायदा घेत आहेत. अशीच एक ऑनलाईन फसवणुकीची (Online Fraud) घटना अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगावमध्ये घडली आहे. कोपरगाव शहरातील सुशिक्षित तरुणीसह दुकानदाराची ऑनलाईन फसवणूक झाल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी सायबर सेलकडे (Cyber Cell) तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलीस या गुन्ह्याचा कसून तपास करीत आहेत. या तपासातून सायबर गुन्हेगारांच्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश (Racket Busted) होण्याची शक्यता वर्तवली आहे.
दोघांना हजारांच्या घरात ऑनलाईन गंडा
अलिकडच्या काळात कोपरगाव शहरासह संपूर्ण तालुक्यात ऑनलाइन फसवणुकीचे अनेक प्रकार समोर येत आहेत. कित्येक सुशिक्षित तरुण-तरुणीदेखील या ऑनलाइन फसवणुकीचे शिकार ठरत आहेत.
सुशिक्षित लोकांना गंडा घालण्याचे धाडस सायबर गुन्हेगार करीत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये प्रचंड भितीचे वातावरण पसरले आहे. कोपरगाव शहरातील एका सुशिक्षित तरुणीची 37 हजार रुपयांची फसवणूक झाली आहे.
तसेच भांड्यांचा व्यवसाय करणाऱ्या दुकानदाराची 17 हजार रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे.
ऑनलाईन भांडी खरेदी करून फसवणूक
शिर्डीतील एका महाठगाने ऑनलाइन भांडी खरेदी केली. त्याचे पैसे ऑनलाइन पाठवण्याचे आश्वासन त्याने दिले. नंतर त्याने बारकोड पाठवला आणि तो स्कॅन करा, असे स्टिल सेंटरचे मालक सादिक पठाण यांना सांगितले.
पठाण यांना ते जमले नाही. त्यामुळे त्यांनी आपल्या दुकानासमोरील एस. के. सर्व्हिसेसच्या कविता बडोगे यांना मदत करण्यास सांगितले. त्यानुसार कविता यांनी पेमेंट प्रोसेस करण्याचा प्रयत्न केला. मात्र पठाण यांच्या अकाऊंटमध्ये पैसे नाहीत. त्यामुळे पेमेंट होत नाही, असे महाठगाने पठाण यांना सांगितले.
त्यावेळी कविता यांनी त्यांच्या अकाउंटवरून प्रयत्न केला. याचदरम्यान दोघे ऑनलाईन फसवणुकीचे शिकार ठरले. दोघांच्या बॅंक खात्यातून 54 हजार रुपये कट झाल्याचे दोघांच्या लक्षात आले.
फसववणूक झाल्याच लक्षात आल्यानंतर कविता बडोगे आणि सादिक पठाण यांनी सायबर सेलकडे तक्रार दाखल केली आहे. पोलीस सध्या या गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत.