मध्यरात्रीच्या सुमारास एटीएम लुटून चोरटे पसार, चोरटे सीसीटीव्हीत कैद
एटीएम फोडण्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. पुरेशी सुरक्षव्यवस्था नसलेले एटीएम टार्गेट करुन चोरटे रक्कम चोरुन पसार होता. अशीच घटना वसईत उघडकीस आली आहे.
वसई : वाढती गुन्हेगारी पाहता गुन्हेगारांना पोलिसांचा धाक राहिला नसल्याचे दिसून येते. चोरीच्या घटनांमध्ये अधिक वाढ झाली आहे. वाढत्या चोऱ्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. वसईत मध्यरात्रीच्या सुमारास एटीएम फोडल्याची घटना उघडकीस आली आहे. एटीएम फोडून 14 लाखांची रक्कम चोरट्यांनी लंपास केली आहे. याप्रकरणी वालीव पोलिसात चोरीची तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करत चोरीचा गुन्हा दाखल करत आरोपींचा शोध सुरु केला आहे. एटीएममधील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. चोरट्यांना पकडण्यासाठी पोलीस सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत.
कटरच्या सहाय्याने एटीएम फोडले
वसई पूर्वेतील भोयदापाडा येथे हिताची बँकेटे एटीएम आहे. या एटीएममध्ये अज्ञात चोरटे मध्यरात्री 2 वाजण्याच्या सुमारास घुसले. यानंतर चोरट्यांनी गॅस कटरच्या सहाय्याने एटीएम तोडले आणि एटीएममधील 14 लाख 83 हजार रुपयांची रक्कम लंपास केली. सर्व प्रकार एटीएममधील सीसीटीव्हीत कैद झाली आहे. चोरीची घटना उघड होताच बँक अधिकाऱ्यांनी वालीव पोलीस ठाणे गाठत आरोपींविरोधात तक्रार दाखल केली. पोलीस सीसीटीव्हीच्या सहाय्याने चोरट्यांचा शोध घेत आहेत.
चोरट्यांच्या शोधासाठी पोलीस पथक रवाना
चोरट्यांची मोडस ऑपरेंडी तपासून, त्यांच्या शोधासाठी वालीव गुन्हे प्रकटीकरण शाखा, वसई आणि विरार क्राईम ब्रँच असे तीन पथक रवाना झाले आहेत. वसई, विरार, नालासोपाऱ्यात अनेक छोट्यामोठ्या बँकेचे एटीएम आहेत. पण सुरक्षाच्या दृष्टीकोनातून म्हणाव्या तशा बँकेकडून उपाययोजना केल्या जात नाहीत. अनेक एटीएमजवळ सुरक्षारक्षकच नाहीत. काही ठिकाणी सीसीटीव्हीही नाहीत. हीच संधी साधून चोरटे एटीएम तोडून मोठमोठ्या रकमा घेऊन फरार होत आहेत.