पाटणा गांधी मैदान बॉम्बस्फोट प्रकरण, चौघांना फाशी, तर दोघांना जन्मठेपेची शिक्षा
बिहारची राजधानी असलेल्या पाटण्यात 2013 साली बॉम्बस्फोटाची मोठी दुर्घटना घडली होती. खरंतर पाटण्यातील गांधी मैदानात एक राजकीय सभा सुरु असताना हा स्फोट घडवून आणण्यात आला होता. या प्रकरणी एनआयए कोर्टाने महत्त्वपूर्ण निकाल जाहीर केला आहे.
नवी दिल्ली : बिहारची राजधानी असलेल्या पाटण्यात 2013 साली बॉम्बस्फोटाची मोठी दुर्घटना घडली होती. खरंतर पाटण्यातील गांधी मैदानात एक राजकीय सभा सुरु असताना हा स्फोट घडवून आणण्यात आला होता. या प्रकरणी एनआयए कोर्टाने महत्त्वपूर्ण निकाल जाहीर केला आहे. कोर्टाने या प्रकरणी चार आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली आहे. तर दोन आरोपींना अजीवन कारावासाची शिक्षा सुनावली आहे. तर दोघांना प्रत्येक 10 वर्ष आणि एकाला 7 वर्ष कारावासाची शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणाचा खटला काही वर्षांपासून सुरु होता. अखेर या प्रकरणी कोर्टाने 27 ऑक्टोबरला 10 पैकी 9 आरोपींना दोषी ठरवलं होतं. तर एकाला पुराव्याअभावी सोडण्यात आलं होतं. त्या आरोपीचं नाव मोहम्मद फखरुद्दीन अहमद असं आहे.
2013 Patna Gandhi Maidan serial blasts | NIA Court Patna pronounces quantum of punishment for 9 convicts-4 get capital punishment, 2 get life imprisonment, 2 get 10-yr imprisonment&one gets 7-yr imprisonment
Blasts had occurred at venue of then PM candidate Narendra Modi’s rally
— ANI (@ANI) November 1, 2021
विशेष सरकारी वकील ललन प्रसाद सिंह यांनी या 27 ऑक्टोबरच्या सुनावणीनंतर प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली होती. “एनआयएचे कोर्टाचे स्पेशल जज गुरविंदर मल्होत्रा यांनी या प्रकरणातील आरोपी इम्तेयाज अंसारी, मुजीबुल्लाह, हैदर अली, फिरोज असलम, नोमान अन्सारी, इफ्तिखार, अहमद हुसैन, उमेर सिद्दिकी आणि अजहरुद्दीन यांना दोषी ठरवलं होतं. तर पुराव्यांअभावी फखरुद्दीनची निर्दोष मुक्तता केली”, अशी माहिती सरकारी वकिलांनी दिली होती.
नेमकं प्रकरण काय?
पाटण्यात गांधी मैदानावर 27 ऑक्टोबर 2013 रोजी भाजपने सभा घेतली होती. या सभेत गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री आणि भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी सहभागी झाले होते. विशेष म्हणजे नरेंद्र मोदींसह भाजपचे इतर मोठे नेते मंचावर दाखल होण्याच्या 20 मिनिटेआधी ही बॉम्बस्फोटाची घटना घडली होती. या कार्यक्रमावेळी गांधी मैदान आणि पाटणा रेल्वे स्थानकावर सिरिअल ब्लास्ट झाला होता. या घटनेत सहा नागरिकांचा मृत्यू झाला होता. तर 90 जण जखमी झाले होते. या घटनेमुळे संपूर्ण देशात खळबळ उडाली होती.
पहिला स्फोट हा पाटणा रेल्वे स्टेशन परिसरात झाला होता. त्यानंतर गांधी मैदानार एका पाठोपाठ एक असे स्फोट झाले. याप्रकरणी एनआयएने तपास सुरु केला होता. एनआयएने या प्रकरणाचा तपास करत असताना वर्षभरात 11 आरोपींना बेड्या ठोकल्या होत्या. त्यानंतर एनआयएने चार्जशीट दाखल केलं होतं. या प्रकरणाची सुनावणी 2018 पासून सुरु झाली होती.
हेही वाचा :
चौकशी आयोगाकडून सुनावणी स्थगित, कामासाठी योग्य जागा नसल्याचं सरकारला पत्र