Kalyan Cheating : 4 कोटींचे कर्ज मिळवून देतो सांगत 40 लाखांचा गंडा, सांगलीतून दोन आरोपींना अटक
कोल्हापूर येथील एका इसमाला जमीन खरोदी करण्यासाठी 4 कोटी रुपयांची गरज होती. यासाठी तो कर्जाचे पर्याय शोधत होता. याचदरम्यान तो चार आरोपींच्या संपर्कात आला.
कल्याण : जमिन खरेदीसाठी 4 कोटींचे कर्ज (Debt) देण्याचे आमिष दाखवत कोल्हापूरच्या इसमाची 40 लाखांची फसवणूक (Cheating) केल्याप्रकरणी कोळसेवाडी पोलिसांनी दोन आरोपींना सांगलीतून अटक (Arrest) केली आहे. राजेश सखाराम पवार, राहुल विलास दाभोळे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. अन्य दोन आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. तक्रारदार कोल्हापूर येथील रहिवासी असून कर्ज घेण्याच्या निमित्ताने त्याची आरोपींशी ओळख झाली होती. आरोपींनी कर्ज मिळवून देण्यासाठी कमिशन आणि प्रोसेसिंग फी साठी 40 लाख रुपये घेऊन पोबारा केला.
काय आहे प्रकरण ?
कोल्हापूर येथील एका इसमाला जमीन खरोदी करण्यासाठी 4 कोटी रुपयांची गरज होती. यासाठी तो कर्जाचे पर्याय शोधत होता. याचदरम्यान तो चार आरोपींच्या संपर्कात आला. आरोपींनी त्याला कल्याण पूर्वेला एका हॉटेलमध्ये मिटिंगसाठी बोलावले. यावेळी चौघांनीही आपली नावे अभय अहुजा, संजय, दिनेश कोटीयान व कुणाल असे सांगितले. आरोपींनी त्याच्याकडून कर्ज मिळवून देण्यासाठी 5 टक्के कमिशन आणि प्रोसेसिंग फी म्हणून 40 लाख रुपये घेतले. मात्र आठवडा उलटला तरी कर्जाबाबत काहीच अपडेट मिळाली नाही. तसेच आरोपींकडूनही प्रतिसाद मिळत नव्हता. यामुळे आपली फसवणूक झाल्याचे फिर्यादीच्या लक्षात आले. यानंतर त्याने कल्याणमधील कोळसेवाडी पोलीस ठाण्यात धाव घेत फसवणुकीची तक्रार दाखल केली. कोळसेवाडी पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल करत तपास सुरु केला.
आरोपींकडून 10 लाखाची रक्कम हस्तगत
तपासादरम्यान, यापैकी दोघे आरोपी सांगलीत फसवणुकीच्या पैशाचे मौजमजा करत असल्याची माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार, कोळसेवाडी पोलीस ठाण्याचे एपीआय हरिदास बोचरे, प्रमोद जाधव, मिलिंद बोरसे यांनी वरिष्ठांच्या आदेशानंतर सांगलीत सापळा रचून राजेश पवार आणि राहुल दाभोळे या दोघांना ताब्यात घेतले. आरोपींना कोळसेवाडी पोलीस ठाण्यात आणून त्यांची चौकशी केली असता त्यांनी गुन्हा कबुल केला. आरोपींकडून 10 लाख रुपयांची रक्कमही हस्तगत करण्यात आली आहे. आरोपींचे दोघे जोडीदार अद्याप फरार असून पोलीस त्यांचाही शोध घेत आहेत. आरोपींनी आतापर्यंत किती लोकांना गंडा घातला याबाबत पोलीस अधिक चौकशी करत आहेत. (Police arrested two people who cheated 40 lakhs by pretending to get a loan)