कानून के हाथ बहुत लंबे.. 30 वर्षांपूर्वी गुन्हा केला, त्याला वाटलं तो वाचला, पण..
Crime News : कानून के हाथ बहोत लंबे होते है.. असं म्हणतात. गुन्हेगार कितीही चलाख असला तरी तो कधी ना कधी पकडला जातोच. अशाच एका गुन्ह्यातील आरोपीला तब्बल 30 वर्षांनी अटक करण्यात आली आहे. दुहेरी हत्याकांड (Double murder) करून फरार झालेला आणि नाव बदलून राहणारा आरोपी अखेर पोलिसांच्या कचाट्यात सापडलाच. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने (Mumbai […]
Crime News : कानून के हाथ बहोत लंबे होते है.. असं म्हणतात. गुन्हेगार कितीही चलाख असला तरी तो कधी ना कधी पकडला जातोच. अशाच एका गुन्ह्यातील आरोपीला तब्बल 30 वर्षांनी अटक करण्यात आली आहे. दुहेरी हत्याकांड (Double murder) करून फरार झालेला आणि नाव बदलून राहणारा आरोपी अखेर पोलिसांच्या कचाट्यात सापडलाच. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने (Mumbai Police Crime Branch) ही कामगिरी केली आहे.
हे प्रकरण लोणावळा येथील आहे. लोणावळ्यातील वृद्ध दाम्पत्याच्या हत्येप्रकरणी 30 वर्षापासून फरार असलेल्या आरोपीस मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखा 9 युनिटने अटक केली आहे. अविनाश भीवराव पवार ( वय 49 वर्षे) असे आरोपीचे नाव असून गेल्या तीन दशकांपासून तो नाव बदलून देशाच्या विविध भागांत वास्तव्य करत होता. सध्या तो विक्रोळी येथे रहात होता. तेथून पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धनराज ठाकरसी कुरवा (55) आणि त्यांची पत्नी धनलक्ष्मी धनराज कुरवा (50) हे दांपत्य लोणावळ्यातील वलवण सत्यम सोसायटीमधील यशोदा बंगल्यात त्यांच्या फ्लॅटबाहेर दुकान चालवत होते. अविनाश भीमराव पवार,( तेव्हा वय 19) हा मूळचा अहमदनगरचा असून तो लोणावळ्यात आपल्या आजीसोबत राहत होता. अविनाश हा नियमितपणे कुरवा यांच्या दुकानात जात असे आणि त्यामुळेच ते त्याला ओळखत होते, असे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.
त्या दिवशी नेमकं काय झालं ?
4 ऑक्टोबर 1993 अविनाश पवार हा त्याचे दोन साथीदार अमोल जॉन काळे उर्फ टिल्लू आणि विजय अरुण देसाई यांच्यासोबत दरोड्याच्या उद्देशाने कुरवा दांपत्याच्या फ्लॅटवर गेला होता. त्यानंतर या तिघांनी दाम्पत्याचा दोरीने गळा दाबून खून केला आणि तसेच त्यांच्यावर चाकूनेही वार केला. यानंतर ते तिघेही घरातून सोने आणि रोख रक्कम घेऊन फरार झाले अशी माहिती पोलिसांनी दिली.
नाव बदलून रहात होता आरोपी
त्यानंतर पवार हा शिर्डीला रवाना झाला व तेथे दोन दिवस राहिला. नंतर तो दिल्लीला गेला आणि जवळपास एक वर्ष हॉटेलमध्ये काम केले, असे पोलिसांनी यांनी सांगितले. त्यानंतर तो सतत त्याचा ठिकाणा बदलत होता. कसारा येथे जाऊन 1996 पर्यंत गॅरेजमध्ये मेकॅनिक म्हणून काम केले. तर 1998 साली अहमदनगरला जाऊन त्याने एका हॉटेलमध्ये ड्रायव्हर-कम-स्टाफर म्हणून काम केले. 1999 साली त्याने लोणावळ्यातील प्रमिलासोबत लग्न केले आणि तो विक्रोळी येथे स्थायिका झाला. तेथे त्याने त्याचे नाव बदलले व तो अविनाश ऐवजी अमित पवार म्हणून वावरू लागला.
या हत्याकांडातील त्याचे दोन साथीदार काळे आणि देसाई यांना अटक करण्यात आली असताना, पवार फरार होता आणि 2018 मध्ये त्याला गुन्हेगार म्हणूनही घोषित करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
लोणावळ्यात परत कधीच गेला नाही
अविनाश पवार याची आजी लोणावळा येथे राहत होती, त्यामुळे त्याचे कुटुंबिय नेहमी तिकडे जायचे. पण पकडले जाण्याच्या भीतीने अविनाश उर्फ अमित पवारने लोणावळ्यात पुन्हा कधीच पाय ठेवला नाही. पोलिस त्याचा सतत शोध घेत होते.
आरोपी संदर्भात मुंबई पोलिसांच्या गुन्हा शाखा 9 नंबर युनिटचे प्रभारी पोलीस निरीक्षक दयानंद नायक यांना त्यांच्या गुप्त बातमीदारांकडून टीप मिळाली. आरोपी अविनाश पवार हा त्याते मूळ नाव आणि ओळख बदलून मुंबईत वावरत आहे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर मिळालेल्या माहितीवरून, पोलिसांनी एक पथक नेमून त्याच्यावर पालत ठेवत सविस्तर माहिती मिळवली. अखेर त्याला विक्रोळी येथून अटक करण्यात आली.
“आपण कोणत्याही गुन्ह्यात सहभागी नसल्याचा दावा आरोपीने प्रथम केला होता. तसेच 1996 मध्ये डोक्याला दुखापत झाल्याने त्याला मागचं काहीच आठवत नसल्याचे त्याने सांगितले. मात्र पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली असता अखेर त्याने हत्येची कबुली दिली,” असे नायक म्हणाले.
पवार याला लवकरच लोणावळा पोलिसांच्या ताब्यात देण्यात येणार आहे.