पुणे एसीबीची धडक कारवाई! महापालिकेत लाचखोरांची संख्या जास्त तर महसूल विभागात सर्वाधिक कारवाया
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईच्या (ACB) आकडेवारीवरूनही महापालिकेत सर्वाधिक लाचखोर असल्याचं समोर येत आहे. एसीबीच्या पुणे (ACB Pune) विभागाने गेल्या आठ महिन्यांमध्ये केलेल्या वेगवेगळ्या कारवायांमध्ये महापालिकेत सर्वाधिक कारवाया करण्यात आल्या आहेत.
पुणे : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या (Pimpri Chinchwad) स्थायी समितीचे अध्यक्ष नितीन लांडगे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti Corruption Bureau) अटक केल्यानंतर महापालिका क्षेत्रातल्या भ्रष्टाचाराच्या चर्चा राज्यभर रंगल्या आहेत. राज्यातल्या मोठ्या महापालिका भ्रष्टाचाराचं कुरण बनलं असल्याच्या चर्चा आता होऊ लागल्या आहेत. त्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईच्या (ACB) आकडेवारीवरूनही महापालिकेत सर्वाधिक लाचखोर असल्याचं समोर येत आहे. एसीबीच्या पुणे (ACB Pune) विभागाने गेल्या आठ महिन्यांमध्ये केलेल्या वेगवेगळ्या कारवायांमध्ये महापालिकेत सर्वाधिक कारवाया करण्यात आल्या आहेत. (ACB Pune has taken most action in this Municipal Corporation)
महसूल विभाग, पोलीस दलातले अधिकारी आघाडीवर
लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या पुणे विभागात पुण्यासह, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर हे पाच जिल्हे येतात. या पाच जिल्ह्यांपैकी पुणे जिल्हा हा लाचखोरीमध्ये अव्वल असल्याचं समोर आलं आहे. दरवर्षी पुणे जिल्ह्यात लाचखोरीच्या सर्वाधिक कारवाया केल्या जातात. त्यातही महसूल विभाग आणि पोलीस दलातले अधिकारी आणि कर्मचारी लाच मागण्यात आणि स्वीकारण्यात आघाडीवर असल्याचं समोर आलं आहे. एनसीबीकडून लाचखोरीत अटक केलेल्यांचं प्रमाणही या दोन्ही विभागात जास्त आहे.
महापालिकेत पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणावर कारवाई
यावर्षी लाचलुचपत विभागाकडून महापालिकेत पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणावर कारवाई करण्यात आली आहे. यंदा इतर विभागांपेक्षा महापालिकेत सर्वाधिक लाचखोर पकडण्यात आले आहेत. कारवाई झालेल्यांमध्येही क्लासवन आणि क्लास टू दर्जाच्या अधिकाऱ्यांची संख्या जास्त आहे. एसीबीच्या पुणे विभागाने यावर्षी आतापर्यंत 39 सापळे रचून त्यामध्ये 56 लाचखोरांना अटक केली आहे. त्यामध्ये तीन क्लासवन, 11 क्लास टू अधिकारी आणि इतरांचा समावेश आहे.
महापालिकांमध्ये 5 सापळ्यांमध्ये 12 जणांना अटक
नेहमीप्रमाणे यंदाही सर्वाधिक सापळे हे महसूल विभाग पोलीस विभाग आणि त्यानंतर महापालिकेत करण्यात आले आहेत. पुणे विभागात येणाऱ्या महापालिकांमध्ये लावण्यात आलेल्या 5 सापळ्यांमध्ये 12 जणांना अटक करण्यात आलं आहे. पोलील विभागतल्या सात सापळ्यांमध्ये नऊ जणांना पकडण्यात यश आलं आहे.
महसूल विभागात लावण्यात आलेल्या 8 सापळ्यांमध्ये 12 जणांना अटक करण्यात आली आहे. याव्यतिरीक्त विधी आणि न्याय विभागात तीन सापळे लावून तीन जणांना अटक केली आहे. आरोग्य विभागातल्या पाच जणांना लाचखोरीत पकडण्यात आलं आहे.
घरी जाऊन घेतली जाते तक्रार
पुणे जिल्हा भौगोलिकदृष्ट्या मोठा आहे. त्यामुळे जिल्ह्यातल्या प्रत्येक तक्रारदारला लाचलुचपत विभागाच्या पुणे कार्यालयात कार्यालयात येऊन तक्रार देणं शक्य होत नाही. त्यामुळे तक्रार करण्याबाबत चौकशी केल्यानंतर संबंधित तक्रारदाराच्या घरी जाऊन तक्रार नोंदवून घेण्याची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सुरूवात केली आहे. यावर्षी झालेल्या कारवायांपैकी सुमारे 60 टक्के कारवायांची तक्रार घरी जाऊन नोंदवण्यात आली होती. केवळ पुणे शहर आणि परिसरातल्या नागरिकांना तक्रार देण्यासाठी कार्यालयात बोलावलं जातं.
संबंधित बातम्या :