Lalit Patil | देवेंद्र फडणवीस यांनी केली उद्धव ठाकरे यांची कोंडी….असे प्रश्न विचारत…
Lalit Patil | ड्रग्स माफिया ललित पाटील प्रकरणात रोज नवनवीन टर्न येत आहे. एकीकडे पोलिसांची चौकशी सुरु असताना दुसरीकडे राजकीय आरोप-प्रत्यारोप होत आहेत. सकाळी संजय राऊत यांनी आरोप केले तर दुपारुन देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना घेरले.
पुणे | 20 ऑक्टोंबर 2023 : ड्रग्स माफिया ललित पाटील प्रकरण गेल्या पंधरा दिवसांपासून चर्चेत आले आहे. पुणे ससून रुग्णालयाच्या गेटवर ललित पाटील याच्या व्यक्तीकडून दोन कोटींचे ड्रग्स जप्त झाले. त्यानंतर ललित पाटील रुग्णालयातून फरार झाला. दोन दिवसांपूर्वी ललित पाटील याला अटक झाली. त्यावेळी त्याने आपण पळालो नाही पळवले गेलो, असल्याचा धक्कादायक खुलासा केला. यामुळे ससून रुग्णालयातील कर्मचारी आणि पोलीस संशयाच्या भवऱ्यात आले असताना राजकीय आरोप-प्रत्यारोप रंगले आहे. नाशिकमध्ये सकाळी संजय राऊत यांनी विद्यामान मंत्री आणि नाशिकमधील आमदारांवर आरोप केले. त्यानंतर दुपारुन देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांची कोंडी केली.
काय म्हणाले संजय राऊत
नाशिकमध्ये बोलताना संजय राऊत म्हणाले की, येथील राजकारण्यांना हप्ता मिळत आहे. मंत्री आणि आमदारांना हप्ता दिला जात आहे. या हप्ताची रक्कम दहा ते १५ लाख आहे. ललित पाटील याचा मित्रपरिवार आणि सहकारी विधानसभेपर्यंत पोहचले आहेत. ड्रग्स रॅकेटमध्ये या सरकारचे आमदार सहभागी आहेत. पोलिसांवर आरोप आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी दिले उत्तर
शुक्रवारी दुपारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते म्हणाले की, ललित पाटील याला डिसेंबर 2020 मध्ये अटक झाली. त्यावेळी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. ललित पाटील याच्याकडे शिवसेनेचे नाशिक जिल्ह्याचे प्रमुखपद उद्धव ठाकरे यांनी त्यावेळी सोपवले होते. त्याला अटक झाल्यावर लगेच पीसीआर घेतला गेला. 14 दिवसांचा पीसीआर मिळाला. त्यानंतर ललित पाटील लगेच रुग्णालयात दाखल झाला. 14 दिवस तो रुग्णालयात होतो. त्यानंतर त्याला सरळ न्यायालयीन कोठडी दिली गेली. सरकारी पक्षाकडून ललित पाटील याच्या चौकशीची कोणताही मागणी झाली नाही. तसेच तो रुग्णालयात असताना मेडिकल बोर्डापुढे उभे करण्याची मागणी झाली नाही.
उद्धव ठाकरे यांची केली कोंडी
आघाडी सरकारचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असताना ललित पाटील याची चौकशी का केली गेली नाही? यासाठी कोणाचा दबाव होता का?, या प्रकारास तत्कालीन मुख्यमंत्री जबाबदार आहे की गृहमंत्री? असे प्रश्न देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केले. या प्रकरणात खूप गोष्टी सांगण्यासारख्या आहेत. परंतु हे सर्व योग्य वेळी आपण जाहीर करु. आता अधिक काही सांगणार नाही, असे सांगत देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणावर सस्पेन्स कायम ठेवले.