sharad mohol | विठ्ठल शेलार याने का केली शरद मोहोळ याची हत्या, काय होता दोघांमधील वाद
Sharad Mohol murder case : पुणे येथील कुख्यात गुंड शरद मोहोळ याच्या हत्या प्रकरणात मोठी बातमी समोर आली आहे. मुळशीचा डॉन विठ्ठल शेलार याला पोलिसांनी अटक केली आहे. या दोघांमध्ये काय होता वाद, का केली विठ्ठल शेलार याने शरद मोहोळ याची हत्या, हे आता समोर आले आहे.
पुणे, दि.16 जानेवारी 2024 | पुणे येथील कुख्यात गुंड शरद मोहोळ याची 5 जानेवारी 2024 रोजी त्याच्या लग्नाच्या वाढदिवशीच गोळ्या घालून हत्या झाली. या हत्या प्रकरणात पोलीस तपासातून नवीन नवीन महिती समोर येत आहे. या हत्या प्रकरणामध्ये सुरुवातीला मुख्य आरोपी मुन्ना पोळेकर असल्याचे समोर आले. त्यानंतर मुन्ना याचा मामा नामदेव कानगुडे याचे नाव हत्या प्रकरणात समोर आले. मोरणे टोळीतील रामदास मारणे हा मास्टरमाइंड असल्याचे समोर आले. परंतु हे तिघे नाही तर चौथाच व्यक्ती मास्टरमाइंड निघाला. मुळशी तालुक्यामधीलच गुंड विठ्ठल शेलार हा या प्रकरणाचा सूत्रधार आहे. दोघांमध्ये काय वाद होते, ते पोलिसांच्या तपासातून समोर आले आहे. या प्रकरणी तपासातून आणखी काय बाहेर येणार? याकडे लक्ष लागले आहे.
काय होते वाद
शरद मोहोळ खून प्रकरणात आतापर्यंत १५ जणांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात विठ्ठल शेलार यालाही अटक करण्यात आली. शेलार याने २०१७ मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्याची पक्षाच्या युवा अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती. मोहोळ याचे मुळशी परिसरात वर्चस्व वाढले होते. कंपन्यांमधील कंत्राटे घेण्यावरुन मोहोळ आणि शेलार यांच्यात वाद सुरु झाला. या वादातून काही महिन्यांपूर्वी मुंबई-बंगळुरु महामार्गावरील राधा हॉटेल चौकात त्याने गोळीबार केला आहे. मुळशीमधील वादामुळे शेलार याने शरद मोहोळ याची हत्या केल्याचे समोर आले आहे.
सहा महिने तयारी
शरद मोहोळ याच्या खुनाची तयारी आरोपी सहा महिन्यांपासून करत होते. जुलै २०२२ मध्ये आरोपी नितीन खैरे याच्या हाडशी गावात मुन्ना पोळेकर आणि इतरांनी गोळीबाराचा सराव केला होता. त्यावेळी आरोपींनी गोळ्यांचे सहा राऊंड फायर केले होते.
शेलार हा सुरुवातीपासून पोलिसांनच्या रडारवर होता. मोहोळचा खून झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी तो गुन्हे शाखेत हजर झाला होता. त्यानंतर फरार झाला. त्याला साथीदारांसह सोमवारी पहाटे पनवेलवरुन अटक करण्यात आली. दिवसभर त्याची चौकशी केल्यानंतर त्याला अटक करण्यात आली.