Pune Murder : दारु पिण्यासाठी पैसे दिले नाही म्हणून नातवाने आजोबांना संपवले, भोर तालुक्यातील धक्कादायक घटना
आजोबांनी दारुसाठी पैसे देण्यास नकार दिला. यामुळे प्रथमेश चिडला आणि जवळच असलेल्या क्रिकेटच्या बॅटने त्याने आजोबांच्या डोक्यात सपासप वार केले.
पुणे : दारू पिण्यासाठी पैसे दिले नाहीत म्हणून 20 वर्षीय नातवा (Grandson)ने क्रिकेट खेळायच्या बॅटने डोक्यात वार करत आजोबांची हत्या (Grandfather Murder) केल्याची धक्कादायक घटना पुण्यातील भोर तालुक्यात घडली आहे. पुण्यातल्या भोर तालुक्यातील आपटी गावात ही धक्कादायक घटना घडलीय. हत्या केल्यानंतर आरोपी पळून जाण्याच्या तयारीत असतानाच पोलिसांनी भोर बस स्थानकातून त्याला अटक (Arrest) केले आहे. प्रथमेश पारठे असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तर नथू पारठे (70) असे हत्या करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी भोर पोलीस अधिक तपास करीत आहेत.
दारुसाठी पैसे न दिल्याने नातवाकडून आजोबांची हत्या
भोर तालुक्यातील आपटी गावात हे पारठे कुटुंब वास्तव्यास आहे. आरोपी प्रथमेश पारठे याला तरुण वयातच दारुचे व्यसन जडले आहे. घराच्या अंगणात मयत नथू पारठे हे बसलेले असताना प्रथमेश तेथे आला. त्याने आजोबांकडे दारुसाठी पैसे मागितले. मात्र आजोबांनी दारुसाठी पैसे देण्यास नकार दिला. यामुळे प्रथमेश चिडला आणि जवळच असलेल्या क्रिकेटच्या बॅटने त्याने आजोबांच्या डोक्यात सपासप वार केले. या मारहाणीत जखमी झालेल्या नथू यांचा जागीच मृत्यू झाला.
पळून जाण्याच्या तयारीत असतानाच पोलिसांनी मुसक्या आवळल्या
दरम्यान त्यांच्याच घरासमोर राहणारे नथू पारठे यांचे भाऊ, दत्तू पारठे हे आरडा ओरडा ऐकून घटनास्थळी आले. तेव्हा आरोपीने त्यांना तुम्ही इथं थांबायचं नाही असा दम दिला आणि त्या ठिकाणाहून फरार झाला. या घटनेनंतर दत्तू पारठे यांनी आरोपी विरोधात भोर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर भोर पोलिसांनी तात्काळ सूत्र हलवली. आरोपी मुंबईच्या दिशेने पळून जाणाच्या तयारीत असताना त्याला भोर बस स्थानक परिसरातून ताब्यात घेतलं आहे. याप्रकरणी भोर पोलीस स्टेशनचे कर्मचारी पुढील तपास करत आहेत. (Grandson killed grandfather by hitting him with a cricket bat at bhor in Pune)