स्कूटीला वाचवायला गेला, रिक्षावरच उलटला! भरधाव कंटेनरमुळे रिक्षाचा चेंदामेंदा
कंटेनर थेट रिक्षावर पडला, रिक्षामध्ये चालक होता. त्याच्यावर जबर प्रहार होऊन तो कंटेनर खालीच दबला गेला.
अश्विनी सातव डोके, प्रतिनिधी, टीव्ही 9 मराठी, पुणे : राज्यातील अपघात सत्र (Maharashtra Accident Latest News) सुरुच आहे. पुण्यात सलग दुसऱ्या दिवशी भीषण अपघात घडला. हडपसर (Hadapsar Accident News) भागात पहाटेच्या सुमारास अपघाताची दुर्दैवी घटना घडली. भरधाव कंटेनर रिक्षा चालकावर काळ बनून आला. एका स्कूटीला वाचवण्याच्या प्रयत्नात असताना कंटेनर चालकाचं नियंत्रण सुटलं. भरधाव कंटेनर थेट रिक्षावरच उलटला. यावेळी रिक्षामध्ये असलेला चालक कंटेनरखाली दबला गेला आणि त्याचा जागीच जीव गेला.
पहाटे पाच ते सहा वाजण्याच्या दरम्यान ही दुर्दैवी घटना घडली. या अपघातामुळे पुणे-सोलापूर रस्त्यावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली. या अपघातात रिक्षा चालक ठार झाला तर तिघे जण जखमी झालेत.
ज्या पद्धतीने कंटेनर रिक्षावर उलटला, त्यात रिक्षा पूर्णपणे चेपली. रिक्षाचा चेंदामेदा झाल्याचंही व्हिडीओत दिसून आलंय. समोर आलेल्या दृश्यांमध्ये रिक्षाचं भयंकर चित्र कॅमेऱ्यात कैद झालंय. त्यावरुन रिक्षाच्या आत असलेल्या चालकाचं काय झालं असेल, याची कल्पनाही अंगावर काटा आणणारी आहे.
नेमका कसा घडला अपघात?
सिमेंटचा मिक्सर जात असताना वाटेत अचानक आलेल्या स्कूटीला वाचवण्यासाठी कंटेनर चालकाने प्रयत्न केला. पण हा प्रयत्न करताना त्याचं नियंत्रण सुटलं. अखेर कंटेनर एका बाजूला कलंडला गेला. दुर्दैवानं हा कंटेनंर एका रिक्षावर उलटला. यात रिक्षाच्या चालकासह एकूण 3 जण जखमी झालेत.
पुणे सोलापूर रोडवर असलेल्या रवी दर्शन येथे बस थांबा आहे. तिथं हा अपघात घडला. या अपघातानंतर क्रेनच्या मदतीने अपघातग्रस्त रिक्षा हटवण्यात आली. त्यानंतर पलटी झालेला कंटेनर हटवण्यासाठीही पोलिसांना शर्थीचे प्रयत्न करावे लागले. या अपघातामुळे मोठी वाहतूक कोंडी झाली होती.
अपघातील जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यातील काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचंही सांगितलं जातंय. त्यामुळे या अपघातातील मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.
एकूण या अपघातामुळे पुन्हा एकदा रस्ते अपघातांचा मुद्दा ऐरणीवर आणला आहे. काल मुंबई-पुणे जुन्या महामार्गावरही एका कंटेनरचा अपघात झाला होता. आता सलग दुसऱ्या दिवशी आणखी एका कंटेनरचा अपघात झाल्याची नोंद करण्यात आलीय.