पुण्यात महिला डॉक्टरच्या बेडरुम-बाथरुममध्ये छुपे कॅमेरे, बड्या एमडी डॉक्टरला अटक
पुण्यातील भारती विद्यापीठ कॅम्पसमधील स्टाफ क्वार्टरमध्ये राहणाऱ्या एका महिला डॉक्टरच्या बेडरुम आणि बाथरुममध्ये कॅमेरे लावल्याची धक्कादायक बाब काही दिवसांपूर्वी उघडकीस आली होती
पुणे : पुण्यातील भारती विद्यापीठ परिसरातील प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरच्या रुममध्ये स्पाय कॅमेरा (Spy Camera) लावल्याप्रकरणी एका बड्या एमडी डॉक्टरला अटक करण्यात आली आहे. 42 वर्षीय डॉ. सुजित जगताप (Dr Sujit Jagtap) याला अटक करण्यात आली आहे. डॉक्टरनेच हे छुपे कॅमेरे लावल्याचे समोरे आल्याने वैद्यकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.
आरोपीला डॉ. सुजित जगतापला आज न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठाडी सुनावली आहे. डॉक्टरने हा छुपा कॅमेरा असणारा बल्ब अमेझॉनवरुन मागवला असल्याचं समोर आलं आहे. 31 वर्षीय डॉक्टर महिलेच्या स्टाफ क्वार्टरमधील बेडरुम-बाथरुममध्ये हिडन स्पाय कॅमेरा सापडला होता.
काय आहे प्रकरण?
पुण्यातील भारती विद्यापीठ कॅम्पसमधील स्टाफ क्वार्टरमध्ये राहणाऱ्या एका महिला डॉक्टरच्या बेडरुम आणि बाथरुममध्ये कॅमेरे लावल्याची धक्कादायक बाब काही दिवसांपूर्वी उघडकीस आली होती. पीडिता सकाळी 8:45 वाजता नेहमीप्रमाणे कामावर गेली होती. सायंकाळी सव्वापाच वाजण्याच्या सुमारास रुममध्ये परत आल्यावर तिला बाथरूम आणि बेडरूममध्ये छुपे कॅमेरे लावले असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर पीडित महिलेने 6 जुलै 2021 रोजी तक्रार नोंदवली होती.
नीलम गोऱ्हे काय म्हणाल्या?
विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पुणे पोलीस आयुक्तांना आरोपींचा तातडीने शोध घेण्याचे निर्देश दिले होते. अशाच प्रकारचे किती गुन्हे आरोपीने केले आहेत, याची माहिती मिळावी, याबाबत पुणे पोलीस आयुक्तांना नीलम गोऱ्हे यांनी निवेदन सादर केले. पोलिसांनी लवकरात लवकर या प्रकरणाची चौकशी करावी म्हणजे असे अनेक गुन्हे समोर येऊन समाजातील सर्व महिलांना तसेच फिर्यादी महिला डॉक्टरांना न्याय मिळेल, असेही मत डॉ नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केले होते.
आरोपींना जामीन न मिळण्याची दक्षता घ्या
आरोपीवर कठोर कारवाई करून त्याला जामीन मिळू नये, याची दक्षता घेण्यात यावी. अशा अपप्रवृत्तीच्या व्यक्तींना कठोर शिक्षा झाल्यास समाजात या गुन्ह्याची पुनरावृत्ती होणार नाही, त्याला निश्चितच आळा बसेल असेही डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सांगितले होते. महिलांनीही सजग राहून सावधानता बाळगावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले होते.
संबंधित बातम्या :
डॉक्टर महिलेच्या बेडरूम आणि बाथरूममध्ये छुपे कॅमेरे आढळल्यानं खळबळ, गुन्हे दाखल
(Hidden Camera in Pune Lady Doctor’s Staff Quarter Bathroom Bedroom Doctor Arrested)