Pune Crime : कार भाड्याने देणे मालकाला महागात पडले, कार घेऊन भाडेकरु फरार
हल्ली वाहन चोरीच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे. ऑनलाईन अॅपच्या माध्यमातून एकाने कार भाड्याने घेतली. भाड्याने घेतलेली कार घेऊन चोरटा पसार झाला.
पुणे / 29 जुलै 2023 : चोरी करण्यासाठी चोरटे काय शक्कल लढवतील त्याचा नेम नाही. अशीच एक घटना पुण्यात उघडकीस आली आहे. अॅपवरुन कार भाड्याने घेऊन चोरटा थेट गुजरातला पोहचला. भाड्याने दिलेली कार परत केली नाही म्हणून मालक फोन करत होता. पण भाडेकरुचा फोनच लागत नव्हता. अखेर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच कार मालकाने हवेली पोलिसात धाव घेत कार चोरीला गेल्याची तक्रार दाखल केली. पोलिसांनी जीपीएसच्या मदतीने कारचे लोकेशन ट्रेस करत गुजरातमधून कार ताब्यात घेतली आहे. आरोपी फरार असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत. अविनाश मावेकर असे फरार आरोपीचे नाव आहे.
अॅपद्वारे कार भाड्याने घेतली
झूमकार अॅपद्वारे आरोपी अविनाश मावेकर याने कार मालकाशी संपर्क साधत भाड्याने कार पाहिजे असल्याचे सांगितले. चार दिवसांसाठी आरोपीने कार भाड्याने घेतली होती. यासाठी अॅपच्या नियमानुसार आवश्यक आधार कार्ड आणि ड्रायव्हिंग लायसन्सची कॉपी जोडली. चार दिवस पूर्ण झाल्यानंतर आरोपीने आणखी तीन दिवस वाढवून घेतले. यानंतर तीन पूर्ण झाल्यानंतर आरोपीने कार परत केली नाही.
पुणे पोलिसांनी गुजरातमधून कार घेतली ताब्यात
कार परत करण्यासाठी कार मालक आरोपीला फोन करत होते. मात्र आरोपीचा फोन बंद येत होता. वारंवार फोन करुनही आरोपीचा फोन लागत नव्हता. अखेर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच मालकाने हवेली पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. मालकाच्या तक्रारीवरुन पोलिसांनी गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरु केला.
कारचे जीपीएसच्या माध्यमातून लोकेशन तपासले असता कार गुजरातमध्ये असल्याचे निष्पन्न झाले. कारचे लोकेशन ट्रेस होताच पुणे पोलिसांचे एक पथक तात्काळ गुजरातला रवाना झाले. पोलिसांनी गुजरातमधून कार हस्तगत केली आहे. मात्र आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाले. पोलीस फरार आरोपीचा शोध घेत आहेत.