Pune Woman Death : कौटुंबिक वाद विकोपाला गेला, शिंदे गटाच्या ‘या’ नेत्याच्या पत्नीने जीवन संपवले !
निलेश माझिरे यांना पुण्याचे डॅशिंग नेते म्हटले जाते. काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांनी त्यांची मनसे पक्षातून हकालपट्टी केली होती. यानंतर त्यांनी शिंदे गटातील बाळासाहेबांची शिवसेनेत प्रवेश केला होता.
पुणे / अभिजीत पोते (प्रतिनिधी) : कौटुंबिक कलहाला कंटाळून शिंदे गटातील निलेश माझिरे यांच्या पत्नीने विष प्राशन करुन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना पुण्यात उघडकीस आली आहे. निलेश माझिरे हे बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे माथाडी कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष आहेत. निलेश यांच्या पत्नीने बुधवारी विष प्राशन केले. त्यानंतर त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान गुरुवारी रात्री रुग्णालयात त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी पुणे पोलीस अधिक तपास करत आहेत. कुटुंबात नेमका कोणत्या कारणातून तणाव होता? याबाबत पोलीस तपास करत आहेत.
काही दिवसांपूर्वी माझिरे यांची मनसेतून हकालपट्टी
निलेश माझिरे यांना पुण्याचे डॅशिंग नेते म्हटले जाते. काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांनी त्यांची मनसे पक्षातून हकालपट्टी केली होती. यानंतर त्यांनी शिंदे गटातील बाळासाहेबांची शिवसेनेत प्रवेश केला होता. माझिरे हे मनसे नेते वसंत मोरे यांचे कट्टर समर्थक मानले जातात.
नगरसेवक वसंत मोरे यांची खास गोष्ट म्हणजे त्यांच्या मतदारसंघात कट्टर मराठी आणि हिंदू मतदारांबरोबरच मुस्लिम मतदारांनाही प्रवेश आहे. त्यामुळेच जेव्हा राज ठाकरेंनी मशिदींतील लाऊडस्पीकर विरोधात मोहीम सुरू केली तेव्हा वसंत मोरे यांनी त्याला विरोध केला.
यानंतर मोरे यांना मनसेतून बाजूला केले असता निलेश माझिरे यांनी विरोध केला. वसंत मोरे यांच्याकडे राज ठाकरे पूर्णपणे दुर्लक्ष करू शकले नाहीत. त्यामुळे मोरे यांचे कट्टर समर्थक निलेश माझिरे यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्याचे बोलले जात आहे. मात्र, पक्षात मोरे यांच्याशी झालेल्या गैरवर्तणुकीचा राग येऊन आपणच पक्ष सोडल्याचे माझिरे सांगत राहिले.
पक्ष सोडताना माझिरे म्हणाले की, आमचा स्वतःच्या विठ्ठलाशी वाद नाही, तर इतरांशी आहे. येथे त्यांनी राज ठाकरे यांची तुलना भगवान विठ्ठलाशी केली आहे. म्हणजेच राज ठाकरे हेच आपल्यासाठी देव असल्याचा दावा त्यांनी तेव्हाही केला होता.