पुणे : जनसेवा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे यांची हत्या करण्यात आल्याने पुण्यात प्रचंड खळबळ उडाली आहे. भर दुपारी आवारे यांची हत्या करण्यात आली. त्यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला. गोळ्या झाडण्यात आल्या. त्यानंतर आरोपी पसार झाले. हल्लेखोरांनी ज्या पद्धतीने हल्ला केला त्यामुळे पोलिसांसमोरही आव्हान निर्माण झाले. पण पोलिसांनी 24 तासात सूत्रे फिरवत आरोपींच्या मुसक्या आवळल्या. त्यानंतर त्यांना आपला खाक्या दाखवताच आरोपी पोपटासारखे बोलले. आरोपींनी आवारे यांच्या हत्येचा पूर्ण प्लॅनच पोलिसांसमोर उघड केला. त्यामुळे हत्येचं खरं कारण उघडकीस आलं.
किशोर आवारे यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी रघु धोत्रे, आदेश धोत्रे, श्याम निगडकर आणि संदीप मोरे या आरोपींना अटक केली. वडगाव मावळ न्यायालयाने या चौघांनाही आठ दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलिसांनी या आरोपींची कसून चौकशी केली. त्यातून धक्कादायक माहिती उघड झाली. पोलिसांनी आरोपींच्या जबाबानुसार नगरसेवक भानू खळदे याचा मुलगा गौरव खळदेला अटक केली आहे. गौरवच या हत्याकांडाचा मास्टरमाइंड असल्याचं उघड झालं आहे.
गौरव खळदे हा सिव्हिल इंजीनिअर होता. तोच स्वतःचा बांधकाम व्यवसाय सांभाळायचा. गौरव खळदेची आणि हत्या करणारा शाम निगडकर यांची मैत्री होती. गौरव खळदे हा शामला वेळोवेळी आर्थिक मदत करत होता. याचं मैत्रीखातर शाम निगडकर आणि त्याच्या साथीदारांकडून किशोर आवारे यांची हत्या करण्यात आली. यासाठी जानेवारीपासून किशोर आवारे याच्या हत्येचा कट रचण्यात येत होता. तर गेल्या महिन्याभरा पासून हे आरोपी रेकी करत होते. अखेर नगरपरिषदेच्या कार्यालयातच आवारे यांना मारेकऱ्यांनी गाठलं आणि त्यांची हत्या केली.
शिरगावचे सरपंच प्रवीण गोपाळे यांची मार्च महिन्यात हत्या झाली. त्यावेळी किशोर आवारे हे वडगांव मावळ कोर्टात गेले होते. त्यावेळी देखील या आरोपींनी त्यांना मारण्याचा कट केला. मात्र गर्दी जास्त वाढल्यानं हा कट फसला आणि दोन दिवसांपूर्वीच ही हत्या झाली, अशी माहिती आता समोर येत आहे.
किशोर आवारे यांनी माजी नगरसेवक भानू खळदे यांच्या विरोधात वृक्षतोड केल्याची तक्रार केली होती. आवारे यांनी नगरपरिषदेच्या सीईओकडे ही तक्रार केली होती. मात्र बांधकाम साईटच्या मार्गालगतची ही वृक्षतोड परवानगीने होती असा दावा भानू खळदे यांनी केला होता. यावरून खळदे आणि आवारे यांच्यात खडाजंगी झाली. यावेळी आवारे यांनी खळदे यांच्या कानाखाली लगावली होती. याच अपमानाचा बदला घेण्यासाठी मुलगा गौरव खळदेने हत्येचा कट रचला, अशी माहिती पिंपरी चिंचवडचे एसीपी पद्माकर घनवट यांनी दिली.