बारामती-जेजुरी रोडवर कारची बाईकला धडक, दाम्पत्याचा जागीच मृत्यू, नातेवाईकांचा ठिय्या
बारामती-जेजुरी रस्त्यावरील आंबी गावाच्या हद्दीत भरधाव कारने कोलते यांच्या दुचाकीला मागून जोराची धडक दिली. या धडकेत कोलते दाम्पत्य जागीच ठार झाले
बारामती : पुणे जिल्ह्यात दुचाकीस्वार दाम्पत्याचा अपघाती मृत्यू (Couple Death) झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. बारामती-जेजुरी रस्त्यावर भरधाव वेगातील कारने दुचाकीला दिलेल्या धडकेत (Pune Accident) पती-पत्नीचा मृत्यू झाला. पुरंदर तालुक्यातील पिसर्वे येथील रहिवासी असलेल्या बाळासाहेब कोलते आणि सविता कोलते यांना या अपघातात प्राण गमवावे लागले. या अपघातानंतर (Baramati Bike Accident) पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन सोडून दिल्याचा आरोप करत संतप्त नातेवाईकांनी मोरगाव पोलिस दूरक्षेत्राबाहेर मृतदेहासह तब्बल चार तास ठिय्या मांडला. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते, मात्र पोलिसांनी त्यावर नियंत्रण मिळवले.
नेमकं काय घडलं?
याबाबत माहिती अशी की, बारामती-जेजुरी रस्त्यावरील आंबी गावाच्या हद्दीत भरधाव कारने कोलते यांच्या दुचाकीला मागून जोराची धडक दिली. या धडकेत कोलते दाम्पत्य जागीच ठार झाले. घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेत गर्दी केली. अपघातानंतर कार चालक दत्तात्रय साळुंके याला पोलिसांनी ताब्यात घेऊन काही वेळात सोडून दिल्याचा आरोप करत संतप्त नातेवाईकांनी पोलिस दूरक्षेत्रात गर्दी केली. संबंधितांवर कारवाई झाल्याशिवाय मृतदेह घेऊन जाणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली
मृत दाम्पत्याच्या नातेवाईकांचा ठिय्या
तब्बल चार तासांहून अधिक काळ नातेवाईकांनी मृतदेह पोलीस दूरक्षेत्रासमोर ठेवले होते. कारवाई झाल्याशिवाय पोलीस ठाण्यासमोरुन हलणार नाही, असा आक्रमक पवित्रा कोलते यांच्या नातेवाईकांनी घेतला. काळी वेळानंतर पोलीस उपअधीक्षक मिलिंद मोहिते, बारामतीचे पोलीस उप विभागीय अधिकारी गणेश इंगळे यांच्यासह वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे यांनी समजूत काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर नातेवाईकांनी कोलते दाम्पत्याचे मृतदेह अंत्यविधीसाठी त्यांच्या मूळ गावी नेले.