दोन मुलांचा आजारपणामुळे मृत्यू, पुण्यात 40 वर्षीय पित्याची गळफास घेत आत्महत्या
संजीव कदम यांचा चौदा वर्षांचा मुलगा आणि दहा वर्षांची मुलगी एक वर्षभरापूर्वी आजारपणामुळे मृत्युमुखी पडले होते. तेव्हापासूनच ते नैराश्यात होते. अखेर त्यांनी टोकाचं पाऊल उचलत गळफास घेतला.
पुणे : मुलांच्या मृत्यूमुळे नैराश्यात असलेल्या पित्यानेही आपल्या आयुष्याची अखेर केली. पुण्यात राहणाऱ्या 40 वर्षीय व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केली. दोन मुलांच्या निधनानंतर पित्याने उचललेल्या टोकाच्या पावलामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.
नेमकं काय घडलं?
पुणे शहरातील किरकिटवाडी परिसरात राहत्या घरात गळफास घेत वडिलांनी आत्महत्या केली. संजीव दिगंबर कदम (वय 40 वर्ष) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. संजीव कदम यांचा चौदा वर्षांचा मुलगा आणि दहा वर्षांची मुलगी एक वर्षभरापूर्वी आजारपणामुळे मृत्युमुखी पडले होते. तेव्हापासूनच ते नैराश्यात होते. अखेर त्यांनी टोकाचं पाऊल उचलत गळफास घेतला. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
पुण्यात वडिलांची मुलींसह आत्महत्या
दोन मुलींसह विहिरीत उडी घेऊन पित्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना काही महिन्यांपूर्वी पुण्यात उघडकीस आली होती. मोबाईल, पैसे विहिरीच्या काठावर काढून ठेवून पित्याने लेकींसह जीवनयात्रा संपवली होती. पुणे जिल्ह्यातील शिरुर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे गावात घडलेल्या या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली. पिता राजेंद्र भुजबळ यांनी दीक्षा राजेंद्र भुजबळ, ऋतुजा राजेंद्र भुजबळ या दोघी मुलींसह विहिरीत उडी मारुन आयुष्य संपवलं होतं.
गडचिरोलीत आई-वडिलांसह मुलाची आत्महत्या
दुसरीकडे, मुलीने पळून जाऊन लग्न केल्याने संपूर्ण कुटुंबाने सामूहिक आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार काही महिन्यांपूर्वी गडचिरोलीत घडला होता. एकाच कुटुंबातील तिघांनी विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली होती. मुलीने पळून जाऊन लग्न केल्याने, आई, वडील आणि भावाने आत्महत्या केली होती.
रवींद्र नागोराव वरगंटीवार (50), वैशाली रवींद्र वरगंटीवार (43) आणि साईराम रवींद्र वरगंटीवार (19) अशी आत्महत्या केलेल्यांची नावं होती. वरगंटीवार यांच्या 24 वर्षीय मुलीने अन्य जातीतील मुलाशी लग्न केल्याच्या रागातून, आई, वडील आणि भावाने आत्महत्या केल्याचा दावा केला जात होता.
रवींद्र वरगंटीवार यांच्या मुलीचे अन्य जातीतील मुलासोबत प्रेमसंबंध होते. मुलीने प्रेम विवाह करण्यासाठी वडिलांची परवानगी मागितली. मात्र, घरच्यांना ही बाब मान्य नसल्याने त्यांनी नकार दिला. पण, प्रेमविवाह करणार असल्याचे ठामपणे सांगून संबंधित मुलगी शनिवारी सायंकाळी पळून गेली. यानंतर तिने मार्कंडादेव मंदिरात विवाह केल्याचं घरच्यांना समजलं. या प्रकाराने वरगंटीवार कुटुंब अस्वस्थ होतं. अनेकांनी त्यांची समजूत काढली, मात्र त्यांचा राग कायम होता. यात रागाच्या तणावातून त्यांनी टोकाचं पाऊल उचललं.
संबंधित बातम्या :
मुलीने पळून जाऊन लग्न केल्याचा राग, आई-वडील, भावाची विहिरीत उडी मारुन आत्महत्या
विहिरीकाठी चपला काढल्या, मोबाईल-पैसे ठेवले, पुण्यात बापाची दोन लेकींसह आत्महत्या