पिंपरी चिंचवड (पुणे) : पिंपरी चिंचवडमध्ये एका साध्या वेशात गस्त घालत असेलल्या गुन्हे शाखेच्या एका पोलीस कर्मचाऱ्याला एकाने जमिनीवर पाडून लाथाबुक्क्याने मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. याप्रकरणी मारहाण करणाऱ्या व्यक्तीविरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अरविंद लक्ष्मण ढिल्लोड असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलीस शिपाई ज्ञानेश्वर गाडेकर हे पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट पाचमध्ये कार्यरत आहेत. दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर ते साध्या वेशात देहूरोड बाजार येथे गस्त घालत असताना ही घटना घडली. आरोपी अरविंद ढिल्लोड हा बालाजी लंच हॉटेलमध्ये जेवणाचे पार्सल घ्यायला आला होता. जेवण पार्सल मिळण्यास विलंब होत असताना महिला लंचहोम चालक यांना आरोपी ग्राहक अर्वाच्य भाषेत बोलत होता. यावेळी पोलीस ज्ञानेश्वर गाडेकर हे त्याठिकाणी उभे होते. त्यांनी आरोपी अरविंद याला महिलेशी चांगल्या भाषेत बोल असे सांगताच आरोपी अरविंदने पोलिसांच्या कानशिलात लगावून दिली. या मारहाणीची घटना लंच होममधील सीसीटीव्ही कॅमऱ्यामध्ये कैद झाली आहे.
संबंधित संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात अचूकपणे दिसतेय. यामध्ये आरोपी व्यक्ती महिलेसोबत बोलत असताना पोलीस कर्मचारी त्याठिकाणी फोनवर बोलत येतात. यावेळी आरोपी महिलेला अर्वाच्य भाषेत बोलतो. यावेळी गस्तीवर असलेले साध्या वेशातील पोलीस कर्मचारी त्याला महिलेशी व्यवस्थित बोलण्याचा सल्ला देतात. यावेळी दोघांमध्ये आधी शाब्दिक वाद होतो. यावेळी पोलीस कर्मचारी आरोपीच्या गालावर हात ठेवतात. त्यानंतर दोघांमध्ये हाणामारीचा भडका उडतो. हाणामारीच्या वेळी पोलीस कर्मचाऱ्याला आरोपी लाथाबुक्यांनी मारहाण करतो. यावेळी रस्त्याने ये-जा करणारी माणसं तिथे जमतात. बघ्यांची मोठी गर्दी तिथे होते. त्यानंतर आरोपीला पोलिसांकडून अटक करण्यात येते.
घटनेचा व्हिडीओ बघा :
VIDEO : पुण्यात पोलिसाला लाथाबुक्क्याने मारहाण, संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद #Pune #Crime #CrimeNews pic.twitter.com/WmyjuiKEZa
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 31, 2021
संबंधित आरोपीने संयम बाळगला असता तर कदाचित ही घटना टाळता आली असती. तसेच तो महिलेशी सौजन्याने वागला असता तर तसं काही झालं नसतं. पण हल्ली फार कमी लोकांकडे संयम बघायला मिळतो. काही वेळा संयम आणि शांतपणे परिस्थिताला सामोरं जाणंच जास्त आवश्यक असतं. आपण आपल्या रागावर नियंत्रण ठेवायला शिकायला हवं. अर्थात जर जास्त रागीट किंवा तापट स्वभाव असेल तर काही वेळा राग नियंत्रणात ठेवणं कदाचित कठीण होऊन बसतं. पण या सवयीचा उपयोग योग्य ठिकाणी वापरायला हवं. आणि राग नियंत्रणात ठेवला तर अशा अनेक घटना आपल्याला टाळता येऊ शकतात.
हेही वाचा :
लिंबोणीच्या झाडामध्ये गांजाची लागवड, पोलिसांनी सुगावा लागला, छापा टाकून 9 लाखांचा गांजा जप्त!
घरातील तिघांनी आधी उंदिर मारायचं औषध घेतलं, नंतर पोलिसांना फोन, पण जे नको घडायला होतं ते घडलंच