मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर चाकूच्या धाकाने ट्रक चालकांची लूट, दोन सराईत गुन्हेगार ताब्यात
खालापूर तालुक्यातील मोरबेवाडी चौक येथे सापळा लावत क्राईम ब्रांचच्या पथकाने गणेश हरिभाऊ वाघमारे आणि संतोष उर्फ मंगल्या वाघमारे या दोघांना ताब्यात घेतले.
![मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर चाकूच्या धाकाने ट्रक चालकांची लूट, दोन सराईत गुन्हेगार ताब्यात मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर चाकूच्या धाकाने ट्रक चालकांची लूट, दोन सराईत गुन्हेगार ताब्यात](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2021/01/25221314/Mumbai-Pune-expressway-min.jpg?w=1280)
पिंपरी चिंचवड : मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर ट्रक चालकांना चाकूचा धाक दाखवून जबरी चोरी करणारी टोळी जेरबंद करण्यात आली आहे. पुण्यातील मावळ भागात स्थानिक गुन्हे शाखेकडून टोळीतील दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मुंबई पुणे दृतगती महामार्गावर वाहन चालकांना लुटल्याच्या घटना अनेक वेळा समोर येत असतात.
सापळा रचून दोघे ताब्यात
खालापूर येथील एक टोळी चोरीचे गुन्हे करत असल्याची खात्रीशीर माहिती गोपनीय माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे एलसीबीच्या पथकाला मिळाली होती. त्यानंतर खालापूर तालुक्यातील मोरबेवाडी चौक येथे सापळा लावत क्राईम ब्रांचच्या पथकाने गणेश हरिभाऊ वाघमारे आणि संतोष उर्फ मंगल्या वाघमारे या दोघांना ताब्यात घेतले.
एक्सप्रेस वेवर ट्रक चालकांची लूट
आरोपी हे सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर खुनाचा प्रयत्न, दरोडा, जबरी चोरी, चोरी, गंभीर दुखापतीसह मारामारी असे गुन्हे दाखल आहेत. मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर ट्रक चालकांना थांबवून चाकूचा धाक दाखवत ते जबरी चोरी करत असल्याचा आरोप आहे.
23 सराईत गुन्हेगार तडीपार
दुसरीकडे, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या अंतर्गत असलेल्या भोसरी, पिंपरी, निगडी, भोसरी एमआयडीसी आणि आळंदी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुन्हेगारांवर तडिपारीची कारवाई करण्यात आली आहे. 23 सराईत गुन्हेगारांना एकाच दिवशी तडीपार करण्यात आले. या 23 गुन्हेगारांना पुणे जिल्ह्यातून 2 वर्षांसाठी तडीपार करण्यात आले. पोलीस उपायुक्त परिमंडळ एक अंतर्गत असलेल्या पोलीस ठाण्याच्या हद्दीतून 2020-21 या वर्षामध्ये 98 सराईत गुन्हेगारांना तडीपार करण्यात आले आहे.
सिंहगडावर पर्यटकांवर कारवाई
दुसरीकडे, कोरोना काळात सार्वजनिक ठिकाणी आणि पर्यटन स्थळी गर्दी करु नका, असे वारंवार सांगूनही अनेकजण सर्रासपणे नियमांचे उल्लंघन करत आहेत. अशाच काही अतिउत्साही पर्यटकांना पुणे पोलिसांनी चांगलाच इंगा दाखवला. सध्या पावसाला सुरुवात झाल्यामुळे अनेक जण सहली काढत आहेत. सिंहगड हा अशा लोकांसाठी हॉट डेस्टिनेशन ठरत आहे. या पार्श्वभूमीवर सिंहगडावर गर्दी करु नये, अशा सूचना पोलिसांकडून वारंवार करण्यात आल्या होत्या. त्यानंतही नागरिकांकडून नियमांचे पालन होत नसल्याने पुणे पोलिसांनी दंडात्मक कारवाईचे पाऊल उचलले आहे.
संबंधित बातम्या :
सिंहगडावर गर्दी करणाऱ्या पर्यटकांना पोलिसांचा इंगा; दोन दिवसांत 88500 रुपयांची दंडवसुली
पालघरमध्ये मद्यपी पर्यटकांचा पोलिसांवर हल्ला, बीचवर पोलिसांच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न
(Mumbai Pune Express Way Truck Drivers looted Gang burst)