IAS पूजा खेडकर यांच्या वडिलांचा आणखी एक कारनामा, बारामतीत जमीन घेतली अन्…
पूजा खेडकर गेल्या आठ दिवसांपासून नॉट रिचेबल आहेत. पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्याविरोधात पूजा खेडकर यांनी मानसिक त्रास दिल्याची तक्रार दिली होती. त्या तक्रारीनंतर पुणे पोलिसांकडून पूजा खेडकर यांना आतापर्यंत तीनवेळा समन्स बजावण्यात आले.

वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्यानंतर त्यांच्या कुटुंबाचेही एक, एक कारनामे उघड होत आहे. त्यांच्या वडिलांचा नवीन कारनामा समोर आला आहे. ज्या पद्धतीने पूजा खेडकर यांनी लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत वेगवेगळे नाव बदलून ११ वेळा परीक्षा दिली. त्याच पद्धतीने पूजा खेडकर यांच्या वडिलांनी नाव बदलून जमीन घेतली. बारामतीमध्ये जमीन घेण्यासाठी दिलीप खेडकर यांनी चक्क वडिलांचे नाव बदलले आहे. दिलीप खेडकर यांनी नावात बदल का केला? प्रशासनाच्या डोळ्यात धूळफेक करण्याचा प्रकार की आणखी काही? असा प्रश्न यानिमित्ताने समोर आला आहे. दिलीप खेडकर यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून चौकशी सुरु आहे.
असे नाव बदलले
दिलीप खेडकर यांनी जमीन घेताना वडिलांच नाव बदलले आहे. त्यांनी बारामतीतील वगळवाडी या भागात १४ गुंठे जमीन घेतली. त्या जमिनीच्या सातबाऱ्यावरील वडिलांचे नाव बदलले आहे. दिलीप धोंडीबा खेडकर असे नाव असताना वडिलांच्या नावात बदल त्यांनी केला आहे. त्यांनी वडिलांचे नाव दिलीप कोंडीबा खेडकर असे केले आहे. धोंडिबा ऐवजी कोंडीबा नाव त्यांनी केले आहे. त्यामुळे दिलीप धोंडीबा खेडकर आणि दिलीप कोंडिबा खेडकर कोण ? असा प्रश्न विचारला जात आहे.
पूजा खेडकर नॉट रिचेबल
पूजा खेडकर गेल्या आठ दिवसांपासून नॉट रिचेबल आहेत. पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्याविरोधात पूजा खेडकर यांनी मानसिक त्रास दिल्याची तक्रार दिली होती. त्या तक्रारीनंतर पुणे पोलिसांकडून पूजा खेडकर यांना आतापर्यंत तीनवेळा समन्स बजावण्यात आले. मात्र तीनवेळा समन्स बजावूनही पूजा खेडकर हजर झाल्या नाहीत. पूजा खेडकर यांचा नंबर संपर्क क्षेत्राच्या बाहेर असल्याची माहिती पुणे पोलिसांनी दिली.




मसूरीत पोहचल्या नाहीत
पूजा खेडकर यांच्या वादामुळे मसूरीतील लालबहादूर शास्त्री प्रशासकीय अकादमीने त्यांचे प्रशिक्षण थांबवले होते. त्यानंतर त्यांना २३ जुलै रोजी अकादमीत हजर होण्याचे आदेश दिले होते. परंतु पूजा खेडकर त्या ठिकाणी पोहचल्या नाहीत. त्यांच्याविरोधात दिल्ली क्राईम बॅचमध्येही गुन्हा दाखल केला आहे. यामुळे पूजा खे़डकर सध्या आहेत कुठे? असा प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान, आयएएस पूजा खेडकर यांचा दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टासमोर अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश देवेंद्र कुमार जंगला यांच्यासमोर त्या अर्जावर आज सुनावणी होणार आहे.