Pune Accident : आईच्या डोळ्यांदेखत मुलाने प्राण सोडला! त्याआधी नेमकं काय घडलं?
सातवीतील मुलाला आई क्लासला घेऊन जात होती, पण वाटेतच नियतीचा क्रूर खेळ
पुणे : सातवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा रस्ते अपघातात दुर्दैवी अंत झाला. धक्कादायक बाब म्हणजे या मुलाने आपल्या आईच्या डोळ्यांदेखतच प्राण सोडला. काळीज पिळवटून टाकणारी ही घटना शाहूनगर येथे घडली. भोसरी एमआयडीसी परिसरात सकाळी आठ वाजण्याच्या दरम्यान एक अपघात घडला. या अपघातात दुचाकीवरुन मुलाची आई आणि मुलगा क्लासला जायला निघाले. त्यावेळी एका कारच्या धडकेनं दुकाकीचा तोल गेला. तोल गेल्यानं खाली कोसळलेल्या मुलाच्या अंगावरुन मागून येणारा ट्रक धडधडत गेला आणि त्यात मुलाचा जागीच मृत्यू झाला.
मृत्यू झालेल्या मुलाचं वय 11 वर्ष असून त्याचं नाव अथर्व अलाने असं होतं. आई आणि मुलगा हे स्पाईन रोड इथले रहिवासी आहेत. हर्षदा अलाने आपल्या 11 वर्षांच्या मुलाला घेऊन दुचाकीवरुन निघाल्या होत्या. त्या मुलाला क्लासला सोडायला जात असताना गुरुवारी सकाळच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली.
मुलाच्या मृत्यूने हर्षदा यांना मोठा धक्काच बसलाय. तर अलाने कुटुंबीयांवरही या घटनेनं मोठा आघात झाला आहे. पोलिसांनी या अपघातप्रकरणी नोंद करुन घेतली असून पुढील कारवाई केली जातेय.
स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अथर्व हा पिंपरी चिंचवड येथील एका खासगी शाळेचा विद्यार्थी होता. त्याची आई त्याला नेहमी स्कुटरवरुन सोडायला जात असे.
शाहूनगर येथील गणपती चौकात हर्षदा आपल्या मुलासह दुचाकीवरुन पोहोचल्या होत्या. त्यावेळी त्यांच्या दुचाकीला कारने धडक दिली. यामुळे हर्षदा यांचा दुचाकीवरील कंट्रोल सुटला आणि ते दोघेही खाली पडले. यावेळी स्कुटरच्या मागेच असलेल्या ट्रकच्या चाकाखाली अथर्व चिरडला आणि त्याचा मृत्यू झाला. तर त्याची आई अगदी थोडक्यात वाचली. हर्षदा यांना या अपघातात किरकोळ जखम झाली.
स्थानिकांनी हर्षदा आणि त्यांचा मुलगा अथर्व या दोघांनाही तातडीने रुग्णालयात दाखल केलं. पण तिथे डॉक्टरांनी अथर्वला मृत घोषित केलं. या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी ट्रक आणि कार चालकाला ताब्यात घेतलंय. पुढील तपास केला जातोय.