पुण्यात असे काय झाले की टोमॅटोवरुन सुरु झाली हाणामारी, प्रकरण गेले पोलिसात
Pune Crime News : कांदा आणि टोमॅटो ही दोन्ही पिके प्रचंड बेभरवश्याची आहेत. अनेक वेळा दर नसल्यामुळे कांदा, टोमॅटो शेतकऱ्यांना रस्त्यावर फेकावे लागतात. परंतु पुण्यात या टोमॅटोमुळे हाणामारी झाल्याचा प्रकार घडला आहे.
पुणे : सध्या टोमॅटोची चर्चा घराघरात सुरु आहे. सर्वसामान्यांच्या घरातील स्वयंपाकघरातून टोमॅटो दिसेनासा झाला आहे. कारण टोमॅटोचे दर वाढले आहेत. नेहमी शेतकऱ्यांना रस्त्यावर फेकावे लागणारे टोमॅटोचा वापर बर्गरमध्ये आत होत नाही. कल्याणमध्ये एका भावाने आपल्या बहिणीला वाढदिवसानिमित्त टोमॅटो भेट दिल्याची घटना घडली. कल्याणमधील या घटनेची चर्चा राज्यातच नव्हे तर देशभरात झाली. टोमॅटोच्या या स्टेरीत आणखी एक वेगळ्या घटनेची भर पडली आहे. टोमॅटोवरुन पुणे शहरात हाणामारी झाली आहे. हा प्रकार पोलीस ठाण्यापर्यंत गेला अन् गुन्हा सुद्धा दाखल झाला आहे.
काय झाला प्रकार
पुणे शहरातील वडगाव शेरी भागात हा प्रकार घडला. गोपाल ढेपे हे भाजीपाला आणण्यासाठी बाजारात गेले. भाजी बाजारात बसलेल्या भाजी विक्रेते अनिल गायकवाड यांना ढेपे यांनी टोमॅटोचे दर विचारला. गायकवाड यांनी टोमॅटो २० रुपयाला पावशेर असल्याचे सांगितले. टोमॅटो खूप महाग असल्याचे गोपाल ढेपे यांनी गायकवाड यांना सांगितले. त्यावरुन अनिल गायकवाड यांनी आपणास शिवीगाळ केली अन् बुक्याने मारहाण केली, अशी तक्रार ढेपे यांनी पोलिसांत दिली. तक्रारीत वजनकाट्यातील वजनाने गालावर मारल्याचा उल्लेख केला आहे. त्यानुसार पुणे येथील चंदननगर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. अनिल गायकवाड यांच्याविरुद्ध हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रकरणाची चर्चा
टोमॅटोवरुन भाजी विक्रेता आणि ग्राहकात हाणामारी झाल्याची बातमी वडगाव शेरी परिसरात पसरली. त्यानंतर या विषयाची चांगलीच चर्चा रंगली होती. तामिळनाडू सरकारने राशन दुकानावरुन टोमॅटो देणे सुरु केले आहे. तामिळनाडूत स्वस्त धान्य दुकानांमध्ये टोमॅटो 60 रुपये किलो भावाने मिळत आहे.महाराष्ट्रात चांगल्या दर्जाच्या टोमॅटोचे दर १०० ते १२० रुपये किलो आहे. परंतु बिहार, झारखंड, मध्य प्रदेश आदी राज्यांमध्ये त्याचे दर १६० रुपये किलोपर्यंत गेले आहे. यामुळे घराघरात टोमॅटोच्या चर्चा तर होणारच…