व्यापारी गाळे मिळवण्यासाठी तलवारी नाचवत जीवघेणा हल्ला, इंदापुरात थरार
या घटनेमध्ये बाभुळगावचे उपसरपंच नागनाथ भिवा गुरगुडे, सरपंच महिलेचे पती सोमनाथ जावळे यांच्यासह आणखी सात जणांवर गंभीर गुन्हे दाखल झालेले आहेत.
इंदापूर : मोक्याच्या ठिकाणी असणारे व्यापारी गाळे मिळवण्यासाठी स्थानिक पदाधिकाऱ्यांनी हातात नंग्या तलवारी घेत धुमाकूळ घातला. पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यात बाभूळगाव या ठिकाणी 11 जुलै रोजी भरदुपारी हा थरार घडला आहे. गाळे देण्यास नकार दिल्यानंतर तिघांवर प्राणघातक हल्ला करण्यात आला. यामध्ये एकाची प्रकृती चिंताजनक आहे. पोलिसांकडून 9 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून सर्व आरोपी फरार आहेत.
नेमकं काय घडलं?
या घटनेमध्ये बाभुळगावचे उपसरपंच नागनाथ भिवा गुरगुडे, सरपंच महिलेचे पती सोमनाथ जावळे यांच्यासह आणखी सात जणांवर गंभीर गुन्हे दाखल झालेले आहेत. गावातील मोक्याच्या ठिकाणी असणारे गाळे आम्हाला दे, नाहीतर तुला मारुन टाकीन असे म्हणत आरोपीने फिर्यादी दत्तात्रेय उंबरे यांना धमकावले. मात्र गाळे देण्यास नकार दिल्यानंतर उंबरे कुटुंबीयांवर प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात तीन जण जखमी असून गंभीर जखमी व्यक्तीला पुढील उपचारासाठी सोलापूरला हलवण्यात आलेले आहे.
नऊ आरोपी पसार
या घटनेचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये आरोपी तलवारी हातात घेत गावात दहशत माजवताना दिसत आहेत, त्यामुळे इंदापूर तालुक्यात पोलिसांचा कसलाच धाक राहिला नाही का, असा सवाल विचारला जात आहे. या घटने संदर्भात गुन्हा दाखल झालेला आहे. मात्र ही घटना होऊन दोन दिवस झाले तरी अद्याप एकाही आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश आलेले नाही. पोलिस या घटनेसंदर्भात बोलण्यासही टाळाटाळ करत आहेत, त्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवरती नागरिकांमधून संशय व्यक्त केला जात आहे.
संबंधित बातम्या :
VIDEO | औरंगाबादेत शेतकरी कुटुंबाला बेदम मारहाण, पुरुषांसह महिलांनाही चोप
जुन्या राजकीय वादातून लाकडी दांड्याने मारहाण, औरंगाबादेत 50 वर्षीय व्यक्ती गंभीर जखमी
(Pune Indapur Family Sword attack)