पुणे : पुण्यातील सामाजिक कार्यकर्ते किशोर आवारे हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट आला आहे. किशोर यांची हत्या राष्ट्रवादीच्या आमदाराने केल्याचा आरोप किशोरच्या आईने केला होता. या आमदाराचं नावही एफआयआरमध्ये दाखल करण्यात आलं होतं. मात्र, पोलिसांच्या प्रत्यक्ष चौकशीत वेगळंच कारण समोर आलं आहे. किशोर आवारे यांच्या हत्येप्रकरणी माजी नगरसेवकाच्या मुलाला अटक करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. आवारे यांनी सर्वांसमोर कानाखाली लगावल्याने त्याचा बदला घेण्यासाठी माजी नगरसेवकाच्या मुलाने आवारे यांची हत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
जनसेवा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे यांची भर दुपारी हत्या करण्यात आली होती. आधी आवारे यांना गोळ्या झाडल्या, त्यानंतर त्यांच्यावर धारदार शस्त्राने वार केला. त्यात त्यांचा मृत्यू झाला. आवारे यांची हत्या झाल्यानंतर त्यांची हत्या कोणी केली याबाबतचे अनेक कयास वर्तवले जात होते. पण आवारे यांच्या आईने थेट राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके यांच्यावर आरोप केला होतो. एफआयआरमध्ये शेळके यांचं नावही घेतलं होतं. या घटनेची पोलिसांनी गंभीर दखल घेत तपास केला असता या प्रकरणात नवाच ट्विस्ट समोर आला आहे.
नगरपरिषदेचे माजी नगरसेवक भानू खळदे यांचा मुलगा गौरव खळदेने ही हत्या घडवून आणल्याचे तपासात समोर आलेलं आहे. अटकेतील आरोपींनीच हत्येमागचं कारण सांगितल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. म्हणून गौरव खळदेला तळेगाव पोलिसांनी अटक केली आहे. आवारे हत्याप्रकरणात माजी नगरसेवकाच्या मुलाला अटक करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. ही हत्या पूर्ववैमनस्यातून झाल्याचंही उघड झाल्याने खळबळ उडाली आहे.
काही महिन्यांपूर्वी जुन्या नगरपरिषद परिसरात भानू खळदे आणि किशोर आवारे यांच्यात खडाजंगी झाली होती. तेव्हा आवारे यांनी भानू खळदे यांच्या कानाखाली लगावली होती. याचाच राग मनात धरून भानू खळदे यांचा मुलगा गौरवने बदला घेण्याचं ठरवलं. त्यानुसार नगरपरिषद कार्यालयातच किशोर आवारे यांची क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची कसून चौकशी केली, तेव्हा त्यांनी गौरव खळदेच्या सांगण्यावरून हत्या केल्याची कबुली दिली, अशी माहिती पिंपरी चिंचवड पोलिसांनी दिली आहे.
दरम्यान, वडगांव मावळ न्यायालयाने अटकेतील चौघांना 8 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. रघु धोत्रे, आदेश धोत्रे, श्याम निगडकर आणि संदीप मोरे अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.