Pune News : मद्यपी कार चालकाने मुलास 500 मीटर फरफटत नेले, जमावाने रोखले अन्…
Pune Crime News : पुणे शहरातील पिंपरी, चिंचवड परिसरात संतापजनक घटना घडली आहे. मद्यधुंद कारचालकाने स्कुटीवरुन जाणाऱ्यास धक्का दिला. त्यानंतर मुलास सुमारे 500 मीटर फरफटत नेले. अखेर जमावाने त्याला रोखले अन्...
पुणे | 13 ऑगस्ट 2023 : पुणे शहरात धक्कादायक घटना घडली. स्कुटीवरुन प्रवास करणाऱ्या आई आणि मुलास कार चालकाने जोरदार धडक दिली. त्यानंतर कार चालक थांबला नाही. सात वर्षीय मुलगा कारच्या खाली अडकला होता. त्यानंतर तो कार चालवत राहिला. जमावाने हा प्रकार पाहिला अन् आरडाओरड सुरु केली. पुढे जमावाने त्या कारचालकास थांबवत चांगलाच चोप दिला. या घटनेत त्या मुलाचा मृत्यू झाला तर त्याची आई गंभीर जखमी झाली. पिंपरी, चिंचवडमधील दिघी-आळंदी रस्त्यावर हा अपघात झाला.
कसा झाला अपघात
पिंपरी चिंचवडमधील चाऱ्होली चौकातून दिघीकडे स्कुटीवरुन आई आणि तिचा मुलगा जात होता. पार्थ प्रणव भोसले (वय ७) हा स्कुटीचा मागे बसला होता तर त्याची आई गाडी चालवत होती. कार चालकाने त्यांच्या गाडीला धक्का दिली. त्यानंतर मध्यधुंद अवस्थेत असलेला गाडी चालक राहुल तपकीर थांबला नाही. पार्थ हा गाडीच्या खाली अडकला होता. जमाव आरडोओरडा करत होता. अन् तो वेगाने गाडी चालवत होता. सुमारे 500 मीटर गेल्यावर जमावाने गाडी थांबवली. त्याला चोप दिला आणि पोलिसांच्या स्वाधीन केले.
मुलास नेले रुग्णालयात
अपघातात गंभीर जखमी झालेल्या पार्थला त्वरित रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु या अपघातात त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या अपघातात पार्थची आईसुद्धा गंभीर जखमी झाली आहे. या घटनेतील आरोपी राहुल तापकीर याने आणखी काही वाहनांना धडक दिली होती. दिघी पोलिसांनी त्याला अटक केली.
काय म्हणाले पोलीस
पीएसआय मछिंद्र पंडित यांनी सांगितले की, अपघातानंतर परिसरातील CCTV फुटेज चेक केली गेले. त्यात कारचालक भरधाव जात असल्याचे स्पष्ट झाले. कार चालक राहुल तपकीर हा चोरली येथील रहिवाशी आहे. त्याला अटक केली आहे. तो मद्यधुंद अवस्थेत होता.