पुणे : तुम्हाला लखोबा लोखंडे माहिती आहे? अनेकांना कदाचित माहिती असेल. ज्येष्ठ लेखक आचार्य अत्रे यांनी लिहिलेल्या ‘तो मी नव्हेच’ या नाटकात अभिनेते प्रभाकर पणशीकर यांनी साकारलेल्या पाच वेगवेगळ्या पात्रांच्या भूमिकेपैकी लखोबा लोखंडे हे एक पात्र. लखोबा हा तंबाखू व्यापारी होता. पण त्याने वेगवेगळे सोंग धारण करत कित्येक महिलांची फसवणूक केली होती. अनेक महिलांना लग्नाचं आमीष दाखवत लुटलं होतं. हे पात्र त्या काळात प्रचंड गाजलं होतं. तेव्हापासून लखोबा लोखंडे हे फक्त नाव नाही तर वृत्ती मानली जाऊ लागली. अशा वृत्तीचे अनेक माणसं आतापर्यंत समोर आले आहेत. पिंपरी चिंचवडमध्ये देखील अशाच एका लखोबा लोखंडेचा प्रताप उघड झालाय. तो खरंतर मुळचा चेन्नईचा आहे. पण त्याने पिंपरी चिंचवडच्या एका तरुणीला फसवलं. अखेर त्याला जेरबंद करण्यात पोलिसांना यश आलंय.
प्रसिद्ध मॅट्रिमोनियल साईटवर आकर्षक प्रोफाईल बनवत देशभरातील विवाहोच्छुक तरुणींची फसवणूक करणाऱ्या लखोबा लोखंडेला अटक करण्यात आली आहे. पुणे जिल्ह्यातील निगडी पोलिसांनी प्रेमराज थेवराज डिकृज या आरोपीला अटक केली. तो मूळ तामिळनाडूतील चेन्नईचा रहिवासी असल्याची माहिती आहे. आरोपी प्रेमराज थेवराजने दोन-तीन महिने चिंचवडमधील एका उच्चशिक्षित तरुणीशी गप्पा मारुन ओळख वाढवली. तिचा विश्वास संपादन करत तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले आणि लाखो रुपये उकळले. आपल्याला पैशांची गरज असल्याचं सांगून त्याने तिच्याकडे बारा लाख रुपयांची मागणी केली.
मी रेल्वे काँट्रॅक्टर आहे. लॉकडाऊन असल्याने कामगारांचे पैसे दिले नाहीत, तर रेल्वे कंत्राट रद्द करेल, असे त्याने खोटे सांगितले. त्याच्या थापांना भुलून तरुणीने आपल्या भावी पतीच्या बँक खात्यावर तब्बल 11 लाख 4 हजार 500 रुपये पाठवले. एवढ्यावरच न थांबता त्याने तिच्याशी लग्न करण्याचा बनाव रचला.
लग्नासाठी प्रेमराजने फिर्यादी तरुणीला चेन्नईला बोलावले. त्यामुळे तरुणी आपल्या मैत्रिणीसोबत चेन्नईला गेली. तिथे त्याने आपला मित्र रजिस्टर ऑफिसमध्ये असल्याचे भासवून तरुणीसोबत नोंदणी पद्धतीने लग्न केल्याचा बनाव रचला. त्यानंतर तरुणी पुण्याला परत आली.
दहा बारा दिवसांनी आरोपीने तिला लग्नाचे खोटे प्रमाणपत्र पाठवले आणि 80 लाख रुपयांचे वैयक्तिक कर्ज काढून देण्याची मागणीही आरोपीने तरुणीकडे केली. तिने नकार देताच आरोपीने तिच्या आई-वडिलांच्या जीवाचे बरे वाईट करण्याची धमकी दिली. अखेर आपली फसवणूक झाल्याचे तिच्या लक्षात आले आणि तिने निगडी पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली. याचा तपास करताना निगडी पोलिसांना प्रेमराज थेवराज या आरोपीने अनेक महिलांची फसवणूक केल्याचे लक्षात आले.
त्यानंतर तरुणीने त्याला भेटायला बोलावले. आरोपी चेन्नईहून पुण्याला विमानाने आला. त्यावेळी पोलिसांनी सापळा रचून त्याला पुणे विमाननगर परिसरात अटक केली. आरोपीकडून विविध कंपन्यांचे सात मोबाईल, तेरा सिमकार्ड, चार एटीएम कार्ड जप्त करण्यात आली आहेत. त्याने शंभरहून अधिक महिलांना संपर्क साधला असून अनेक जणींशी साखरपुड्याचे नाटक करत त्यांच्याकडून कोट्यवधी रुपयांची लूट केल्याचा आरोप आहे.
हेही वाचा :