Pune Accident | पुणे शहरात संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती, दारुच्या नशेत दहा ते पंधऱ्या गाड्यांना उडवले
Pune Accident | पुणे शहरात संतोष माने अपघाताच्या आठवणी रविवारी ताज्या झाल्या. संतोष माने अपघाताची पुनरावृत्ती झाल्यामुळे थरकाप उडाला. एका मद्यधुंद वाहन चालकाने पीएमटीची बस चालवली. अनेक गाड्यांना उडवले.
अभिजित पोते, पुणे | 22 ऑक्टोंबर 2023 : पुणे शहरात पुन्हा संतोष माने प्रकरणाची रविवारी पुनरावृत्ती झाली. हिट अँड रन सारखा प्रकार समोर आला. हा प्रकार चक्क पीएमटीच्या चालकाने केले आहे. पीएमटीच्या बस चालकाने दारू पिऊन बस चालवली. त्यावेळी रस्त्यात आलेल्या दहा ते पंधरा गाड्यांना त्याने उडवले. तो गाडी चालवत असताना बसमध्ये तब्बल 50 प्रवाशी होते. ते सर्व जीवमुठीत धरुन बसले होते. दरम्यान, मद्यपान केलेल्या चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याने हा प्रकार का केला? हे कारण अद्याप समोर आले नाही. हा सगळा प्रकार लक्षात येताच प्रवाशांनी आरडाओरडा करण्यास सुरूवात केली होती.
दारुच्या नशेत उलटी बस चालवली
पुणे येथील पीएमटी बसचालक निलेश सावंत याने संतोष मानेसारखा प्रकार रविवारी केला. त्याने दारूच्या नशेत बस चालवत सुमारे 10 ते 15 गाड्यांना उडवले. सेनापती बापट रोड, वेताळबाबा चौकात हा अपघाताचा थरार घडला. तो बस चालवत असताना त्यात 50 प्रवाशी बसले होते. दारूच्या नशेत निलेश सावंत याने उलटी पीएमटी बस चालवत अनेक वाहनांना धडक दिली.
या तरुणामुळे वाचले अनेकांचे प्राण
पुणे येथील पीएमटी बसचालक निलेश सावंत दारुचा नशेत बस चालवत होता. यावेळी कृष्णा जाधव यांनी जीवाची परवा न करता या लोकांना वाचवले. बसचालका विरोधात चतुशृंगी पोलीस स्टेशनमध्ये सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संतोष माने प्रकरणाची आठवण
निलेश सावंत याने रविवारी केलेल्या प्रकारामुळे पुणे शहरात 2012 मध्ये घडलेल्या संतोष माने प्रकरणाची आठवण ताजी झाली. संतोष माने याने दारुच्या नशेत 25 जानेवारी 2012 मध्ये स्वारगेट स्थानकातून पीएमटीची बस काढली. त्यानंतर रस्त्याने जाणाऱ्या अनेक वाहनांना धडक दिली. या अपघातात 9 जणांचा मृत्यू झाला होता. तसेच अनेक जण जखमी झाले होते. संतोष माने याला या प्रकरणात फाशीची शिक्षा झाली होती.