पेट्रोल पंपावर दरोडा टाकणारी टोळी जेरबंद, तीन दिवसात दोन ठिकाणी टाकला होता दरोडा
पोलिसांनी चारही आरोपींना शिरूर आणि श्रीगोंदा येथून अटक केली आहे. चारही आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना 23 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
पुणे : पेट्रोल पंपावर दरोडा टाकणाऱ्या टोळीला जेरबंद करण्यास पुणे ग्रामीण पोलिसांना यश आले आहे. तीन दिवसात दोन पेट्रोल पंपावर आरोपींनी दरोडा टाकला होता. पोलिसांनी चारही आरोपींना शिरूर आणि श्रीगोंदा येथून अटक केली आहे. चारही आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना 23 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. आरोपींकडे चोरीचा मुद्देमाल अद्याप मिळाला नाही.
आरोपींकडून हत्यारे जप्त
करण युवराज पठारे, रोहन सोमनाथ कांबळे, अजय जगग्नाथ माळी, अजय सोमनाथ लकारे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेले 4 कोयते देखील जप्त करण्यात आलेत. अन्य दोन आरोपी अद्याप फरार आहेत.
कोयत्याचा धाक दाखवून पेट्रोलपंपावर केली लूट
शिरुर येथील श्री शिवसाई फ्युअल स्टेशन येथे 12 नोव्हेंबर रोजी मोटारसायकलवरुन आलेल्या चार इसमांनी कोयत्याचा धाक दाखवत लूट केली. पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांना कोयत्याचा धाक दाखवून 49,400 रुपये रोख आणि एक मोबाईल लुटून चोरट्यांनी पोबारा केला.
यानंतर न्हावरा गावच्या हद्दीतील आयओका पेट्रोलियम येथे 15 नोव्हेंबर रोजी दुसरी घटना घडली होती. मोटारसायकलवरुन आलेल्या सहा इसमांनी कोयत्याचा धाक दाखवत 1, 02, 000 रुपयांची रोकड, मोबाईल फोन आणि पाकिट लुटून नेले.
सीसीटीव्हीच्या आधारे आरोपींना अटक
पुणे पोलिसांनी गुन्ह्याचा तपासाकरीता दोन पथके तयार करत तात्काळ तपास सुरु केला. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सीसीटीव्ही फुटेज तपासत तांत्रिक माहितीच्या आधारे तपास सुरु केला. तपासादरम्यान मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी चौघा आरोपींच्या मुसक्या आवळल्या.