ISIS terrorist | कोण आहे इसिसचा दहशतवादी शाहनवाज ? NIA ने जाहीर केले होते 3 लाखांचे बक्षीस
Nia pune isis module terrorist | पुणे पोलिसांच्या कस्टडीतून फरार झालेला इसिस मॉड्यूल प्रकरणातील दहशतवाद्यास दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने बेड्या ठोकल्या आहे. गेल्या अनेक दिवसांपासून फरार असलेल्या शाहनवाजवर एनआयएने तीन लाखांचे बक्षीस जाहीर केले होते.
पुणे | 2 ऑक्टोंबर 2023 : पुणे पोलिसांनी 18 जुलै रोजी दोन दशतवाद्यांना पकडले होते. त्यावेळी पुणे पोलिसांच्या हातातून निसटलेला इसिस मॉड्यूलचा धोकादायक दहशतवादी शाहनवाज उर्फ शैफी उज्जमा याला पकडण्यात यश आले आहे. दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने त्याला बेडया ठोकल्या आहे. यामुळे पुणे इसिस मॉड्यूल प्रकरणात अटक झालेला हा आठवा आरोपी आहे. या दहशतवाद्यांनी आयईडी बनवण्याचे प्रशिक्षण घेतले होते. तसेच इतरांना प्रशिक्षण देण्यासाठी कार्यशाळा घेतली होती. देशात बॉम्बस्फोट घडवून अराजकता निर्माण करण्याचा त्याचा कट होता.
कोण आहे शाहनवाज
दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने रविवारी रात्री शाहनवाज याला अटक केली. त्यानंतर दिल्ली न्यायालयात उभे केले असता त्याला सात दिवसांची पोलीस कोठडी मिळाली. अभियांत्रिकीचे शिक्षण घेतलेला शाहनवाज हा धोकादायक दहशतवादी आहे. त्याला बॉम्ब बनवता येत होते. त्याच्या घरातून रासायनिक पदार्थ जप्त केली होते. पुणे पोलिसांनी एका मोटारसायकल चोरी प्रकरणात दोन आरोपींना 18 जुलै रोजी पकडले होते. महम्मद इम्रान महम्मद युसूफ खान ऊर्फ अमीर अब्दुल हमीद खान आणि महम्मद युनूस महम्मद याकूब साकी यांना पोलिसांनी पकडले होते. परंतु शाहनवाज फारर झाला होता.
पुणे ते दिल्ली प्रवास
शाहनवाज पुण्यातून फरार होऊन दिल्लीत पोहचला होता. पुणे शहरातून फरार झाल्यापासून तो दिल्लीत होता. तो आपली ठिकाणे वारंवार बदलत होता. राष्ट्रीय तपास संस्थेला तो दिल्लीत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर एनआयएने दिल्ली पोलिसांना अलर्ट केले होते. अखेर दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने त्याला रविवारी रात्री बेड्या ठोकल्या.
दहशतवादी हल्ल्याची शाहनवाजची योजना
शाहनवाज हा बॉम्बची निर्मिती करण्यात एक्सपर्ट होता. त्याने त्याच्या दहशतवादी सहकाऱ्यांसोबत सांगली, सातारा, कोल्हापुरातील जंगलात बॉम्बची चाचणी केली होती. देशात दहशतवादी हल्ला करण्याची त्यांची योजना होता. या प्रकरणात एटीएसने आकिफ अतीक नाचन आणि जुल्फिकार अली बडौदावाला यालाही अटक करुन एनआयएकडे दिले होते. त्यांना विदेशातून निर्देश मिळत असल्याचे तपासातून उघड झाले.