पुणे : पुण्यात सध्या एका राजकीय गुरुची प्रचंड चर्चा सुरु झाली आहे. या राजकीय गुरुने एका प्रतिष्ठित कुटुंबातील सुनेचा पायगुण चांगला नसल्याचं सांगून तिच्या पतीला छळ करण्याचा सल्ला दिला. विशेष म्हणजे या राजकीय गुरुचा भक्त असलेला काँग्रेसचा नेता गणेश गायकवाडव याने आपल्या पत्नीचा छळ केला. त्याने पत्नीला सिगारेटचे चटके दिले. त्यामुळे गायकवाड कुटुंबाच्या सुनेने पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास केला. त्यानंतर अखेर पुण्याच्या औंध येथे वास्तव्यास असलेला राजकीय गुरु रघुनाथ येमूल याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. रघुनाथ येमुल हा पुण्यासह देशभरातील प्रशासकीय आणि राजकीय मंडळींचा गुरू आहे. त्यामुळे या प्रकरणामुळे राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
रघुनाथ येमूल हा स्वत:ला ‘ज्योतिषाचार्य’ तसेच ‘ध्यानगुरु रघुश्री’ म्हणवून घेतो. त्याने ध्यानगुरु रघुश्री या नावानेच आपली ओळख निर्माण केली. त्याने स्वत:चा नीती संप्रदायही सुरु केला आहे. सोशल मिडियाद्वारे तो रोजच्या दिवसाचे महत्त्व आणि शुभ मुहूर्त सांगतो. त्याच्याकडून आपला हात पाहण्यासाठी अपॉईटमेंट घ्यावी लागते. त्याच्याजवळ केवळ हात पाहण्यासाठी काही हजार रुपये मोजावे लागतात. हात पाहण्याचा हा कार्यक्रम जवळपास एक तास चालतो. त्यातून तो त्या व्यक्तीला आपल्या जाळ्यात ओढतो. रघुनाथ येमूल याने सिद्धी कार्मयोगी फाऊंडेशनची स्थापना केली आहे. तो या फाऊंडेशनचा अध्यक्ष आणि गोसेवा शोध केंद्राचा कन्व्हेअर आहे.
पुण्यातील प्रसिद्ध उद्योजक आणि राजकारणी गणेश गायकवाड याच्यावर गंभीर आरोप आहेत. त्याने ज्योतिषी रघुनाथ येमूल याच्या सल्ल्यानुसार पत्नीवर अघोरी प्रथांचा वापर करुन छळ केला. गणेश गायकवाड याने आपल्या 27 वर्षीय पत्नीवर अनैसर्गिक अत्याचार केल्याची तक्रार स्वत: पीडित महिलेने पोलीस ठाण्यात केली आहे. पतीने अघोरी प्रकाराने ठार मारण्याचा प्रयत्न केला, असा आरोप फिर्यादी महिलेने केला होता.
पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला तेव्हा या प्रकरणातील राजकीय गुरू येमुलचं कनेक्शन समोर आलं. येमुल याने गायकवाड कुटुंबाला तुमची सून अवदसा असून पांढर्या पाय गुणांची आहे. तिची जन्मवेळ चुकीची आहे, त्यामुळे ग्रहमान दूषित झाले आहेत. जर तुझी ही बायको म्हणून अशी कायम राहिली तर तू आमदार होणार नाही, मंत्री होणार नाहीस त्यामुळे तिला लवकरात लवकर सोडचिठ्ठी दे, मी देतो ते लिंबू उतरविल्यावर तुझ्या मागची पिडा कायमची निघून जाईल, असे पिडितेचा पती गणेशला सांगितले. त्यानंतर पती गणेश याने आपल्या पत्नीवरून लिंबू ओवाळून टाकल्याचा प्रकार घडला. यामुळे संसार मोडण्यासाठी अनिष्ठ रूढी परंपरा अघोरी कृत्याचा वापर झाल्याच्या कारणावरून येमुल गुरूजीस अटक करण्यात आलीय.
येमुल गुरूजीचे राजकीयपासून प्रशासनातील अनेक वरिष्ठ अधिकार्यांशी नजीकचे संबंध आहेत. आपला हात पाहण्यासाठी अनेकजण गुरूजीच्या दरबारात हजेरी लावतात. त्यामुळे संबंधीत प्रकरणात गुरूजीला अटक केल्यामुळे खळबळ उडाली आहे. गुरूजीला अटक केल्यानंतर त्याला ज्या पोलिस ठाण्याच्या लॉकअपमध्ये ठेवण्यात आले होते, तेथे त्याचे भक्त त्याला भेटण्याचा प्रयत्नही करीत होते. त्यामुळे या प्रकरणात अंनिसने उडी घेतली असून कारवाईची मागणी केली आहे.
गणेश नानासाहेब गायकवाड हा पुण्याच्या औंध परिसरात राहतो. प्रसिद्ध उद्योजक असून पाषाण आणि बाणेर परिसरात त्यांच्या अनेक मालमत्ता आहे. औंध आणि बाणेर परिसरात त्यांनी अनेक मॉल, आयटी कंपन्या, दुकाने यांना आपल्या जमिनी, दुकाने, कार्यालये भाडेतत्त्वावर दिली आहेत. यातून गणेश गायकवाड याला दरमहा अडीच ते तीन कोटी रुपयांचे उत्पन्न मिळत असल्याची माहिती आहे. काही दिवसांपूर्वी त्याने भाजपला रामराम करत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. पिंपरी-चिंचवडचे भारतीय जनता पक्षाचे आमदार लक्ष्मण जगताप हे गणेश गायकवाड याचे जवळचे नातेवाईक आहेत. गणेश गायकवाड यांची पत्नी एका माजी आमदारांची मुलगी आहे. तीन वर्षांपूर्वी 2017 मध्ये त्यांचे लग्न झाले होते.
संबंधित बातमी : पुण्यातील बड्या राजकारण्यांच्या गुरुला बेड्या, लॉकअपमध्ये भक्तांची गर्दी, राजकीय क्षेत्रात खळबळ