पुण्यात ‘सैराट’, आंतरधर्मीय विवाह केला म्हणून तरुणाचं अपहरण मग हत्या, पुरावे नष्ट करण्यासाठी….

| Updated on: Jul 09, 2024 | 6:57 PM

आंतरधर्मीय विवाह केला म्हणून साडूने आपल्या मेहुण्यांच्या मदतीने स्वतःच्याच साडूची अपहरण करून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपीने मृतदेहाचे पुरावे नष्ट करण्यासाठी त्याचा मृतदेह जाळून मृतदेहाचे अवशेष नदीपात्रात फेकले.

पुण्यात सैराट, आंतरधर्मीय विवाह केला म्हणून तरुणाचं अपहरण मग हत्या, पुरावे नष्ट करण्यासाठी....
आंतरधर्मीय विवाह केला म्हणून तरुणाचं अपहरण मग हत्या
Follow us on

पुणे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवड शहर एका हत्येच्या घटनेनं हादरलं आहे. एका साडूने आपल्या साडूचीच हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. आंतरधर्मीय विवाह केला म्हणून मुलाची हत्या करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. खरंतर हा ऑनर किलिंगचाच प्रकार आहे. विशेष म्हणजे ‘सैराट’ चित्रपटासारखाच हा प्रकार आहे. सैराट चित्रपटातही शेवटी आर्ची आणि परशा या दोघांना मारलं जातं. पुण्यातील घटनेत तरुणाची हत्या करण्यात आली आहे. संबंधित घटना समोर आल्यानंतर स्थानिकांकडून या घटनेवर हळहळ व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे आरोपींना पोलिसांचं भय राहिलेलं नाही का? असा प्रश्न या निमित्ताने निर्माण होतोय. विज्ञान आणि तंत्रज्ञानात कितीही विकास झाला तरी काही जणांच्या बुद्धिचा विकास अद्याप झालेलाच नाही हेच या घटनेतून स्पष्ट होत आहे. आजही काही लोक जात-पात, धर्म या गुरफट्यात अडकलेली दिसत आहेत. विशेष म्हणजे त्यातून ते चक्क हत्या करत आहेत. त्यामुळे आरोपींवर आता कठोरता कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी केली जात आहे.

नेमकं काय घडलं?

आंतरधर्मीय विवाह केला म्हणून साडूने आपल्या मेहुण्यांच्या मदतीने स्वतःच्याच साडूची अपहरण करून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपीने मृतदेहाचे पुरावे नष्ट करण्यासाठी त्याचा मृतदेह जाळून मृतदेहाचे अवशेष नदीपात्रात फेकले. पिंपरी चिंचवड शहरातील मोशी येथील आदर्श नगर येथे 15 जूनला ही धक्कादायक घटना घडली. या घटनेत अमीर शेख या 25 वर्षाच्या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मयत अमीर शेख याने पंकज विश्वनाथ पाईकराव याच्या बायकोच्या बहिणीसोबत आंतरधर्मीय लग्न केलं होतं. याचाच राग मनात धरून पंकज विश्वनाथ पाईकराव याने आपल्या मेहुण्यांच्या मदतीने हे कृत्य केलं.

आरोपी पंकज विश्वनाथ पाईकराव याने आपला मेहुना सुशांत गोपाळ गायकवाड, गणेश दिनेश गायकवाड आणि त्यांचा मित्र सुनील किशन चक्रनारायण याच्या मदतीने 15 जूनला अमीर मोहम्मद शेख याला दारू पिण्यासाठी बोलवलं. आरोपींनी मोशीमधील आदर्श नगर येथून मृतकाचं अपहरण केलं आणि तिथेच त्याची हत्या केली.

या प्रकरणात एमआयडीसी भोसरी पोलिसांनी या गुन्ह्यातील चारही आरोपींच्या विरोधात भादवि कलम 364, 302, 201, 120 ब आणि 34 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. तसेच गुन्ह्यातील तीन आरोपींना अटक केली आहे. तर गणेश दिनेश गायकवाड हा आरोपी अजूनही फरार आहे.