Pune Crime : डोळ्यांदेखत बाईक चोरूनही कधीच पकडला जायचा नाही, शर्टाचा जुगाड करणारा तो लढवायचा भारी शक्कल ! अखेर..
बाईक चोरणाऱ्या शातीर चोराला पोलिसांनी अटक केली असून त्याच्याकडून ८ बाईक्स जप्त करण्यात आला आहे. मात्र या चोऱ्या करण्यासाठी त्याने जी नामी शक्कल लढवली होती, ती ऐकून पोलिसही थक्क झाले.
पुणे | 20 सप्टेंबर 2023 : चोर किंवा एखादा गुन्हेगार (criminal) कितीही शातीर असला तरी तो कधी ना कधी पकडला जातोच. पुण्यातील गुन्ह्यांच्या घटना (crime news) आजकाल बऱ्याच वाढल्या असून त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यासाठी पोलिसांनी बंदोबस्त वाढवला असून पोलिसांनी नुकतीच अशा एका शातीर बाईक चोराला (bike thief) अटक केली आहे. मात्र त्याचे कारनामे ऐकून पोलिसही थक्क झालेत.
पुणे शहर पोलिसांच्या क्राईम ब्रांच युनिटने एका अतिहुश्शार चोराला अखेर जेरबंद केले आहे. बाईक्स चोरल्याप्रकरणी हडपसर येथून त्याला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी त्याच्याकडून आत्तापर्यंत ८ बाईक्स जप्त केल्या आहेत. मात्र बाईक चोरीसाठी त्याने जी शक्कल लढवली होती, ती समजल्यावर सर्वच थक्क झाले.
बाईक्स चोरण्यासाठी लढवली अनोखी शक्कल
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुझफ्फर उर्फ सलमान पठाण (वय २६) असे या आरोपीचे नाव आहे. तो मंजरी खुर्द येथील रहिवासी आहे. मुझफ्फर हा एक बाईक चोरताना सीसीटीव्हीमध्ये कैद झाला होता. ते फुटेज पाहिल्यानंतर पोलिसांनी या बाईक चोरणाऱ्या ठगाला अटक करण्यासाठी जंग-जंग पछाडले. अखेर अथक प्रयत्नांनंतर तो पोलिसांच्या ताब्यात साडला आणि त्याला अटक झाली.
मात्र बाईक्स चोरताना तो एक अनोखी शक्कल लढवायचा. बाईक्स चोरायला जाताना आरोपी मुझफ्फर हा एकावर एक असे ८ ते १० शर्ट चढवून किंवा घालून जायचा. एकदा का बाईक चोरून धूम ठोकली की दर थोड्या-थोड्या अंतराने तो अंगातील शर्ट बदलायचा. बाईक चोरीनंतर सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालोच तरी कोणीही आपल्याला ओळखू नये म्हणून त्याने ही शक्कल लढवली. बाईक चोरून फरार झाल्यावर थोड्या-थोड्या अंतरावर तो अंगातील एकेक शर्ट काढून टाकायचा. त्यामुळे त्याच्या शरीरावर नेहमी नवा शर्ट दिसायचा आणि कोणी त्याला ओळखू शकायचे नाही, पकडण्याचा प्रश्न तर दूरच राहिला.
पोलिसांनी या शातीर आरोपीला अटक करून आठ वेगवेगळ्या केसेस सोडवल्या आहेत. तसेच त्याच्याकडून सुमारे १ लाख ८५ हजार रुपये किमतीच्या आठ वेगळ्या बाईक्सही पोलिसांनी ताब्यात घेतल्या आहेत. याप्रकरणी अधिक तपास करण्यात येत आहे.