ऊस तोडणीवेळी अचानक जमिनीखालून जे निघालं त्याने सर्वच हादरले, किंचाळतच सर्व शेतातून पळाले; काय घडलं असं?
अनेक गावात सध्या उसतोडणीची कामं सुरू आहेत. जुन्नर तालुक्यातील एका गावातही ऊसतोडणीचे असेच काम सुरू होते. मात्र त्यादरम्यान जमीनीखालून असं काही निघालं, जे पाहून सर्वच हादरले. काहींची तर भीतीने बोबडीच वळली
सुनील थिगळे, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, पुणे | 21 फेब्रुवारी 2024 : अनेक गावात सध्या उसतोडणीची कामं सुरू आहेत. जुन्नर तालुक्यातील एका गावातही ऊसतोडणीचे असेच काम सुरू होते. मात्र त्यादरम्यान जमीनीखालून असं काही निघालं, जे पाहून सर्वच हादरले. काहींची तर भीतीने बोबडीच वळली. असं काय होत त्या शेतात? मिळालेल्या माहितीनुसार, जुन्नर तालुक्यातील पिंपळगाव तर्फे नारायणगाव येथे उसाची तोडणी सुरू असताना एका उसाच्या शेतामध्ये वयोवृद्ध पुरूषाचा सांगाडा आढळला आणि एकच खळबळ माजली. सुमारे 75 वर्षांच्या वृद्धाचा हा सांगाडा असून बाबामीया सय्यद मोमीन यांचा तो मृतदेह असावा, असा प्राथमिक अंदाज पिंपळगावच्या ग्रामस्थांनी व्यक्त केला. त्यानंतर त्यांच्या मुलाला, हरून याला तेथे पाचारण करण्यात आले असता, त्यानेही या वृत्ताला दुजोरा दिला आहे. बिबट्याच्या हल्ल्यातून ही घटना घडली असावी असेही नातेवाईकांचे म्हणणे आहे.
सहा महिन्यांपासून होते गायब
याबाबत पोलिसांनी सविस्तर माहिती दिली. पिंपळगाव तर्फे नारायणगाव येथील बाबामीया सय्यद मोमीन (वय वर्ष 75) हे गेले सहा महिन्यांपासून गायब होते. त्यावेळी त्यांच्या मुलाने, नातेवाईकांनी त्यांचा खूप शोध घेतला परंतु ते कुठेच सापडले नाहीत. दरम्यान आज पहाटे विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे ऊस तोडणी मजूर बाबामीया मोमीन यांच्या आमराई येथील उसाची तोडणी करत असताना एका पुरूषाच्या हाडांचा सांगाडा आढळून आला. त्यांनी याबाबतची माहिती तात्काळ ऊस मालकाला दिली. बाबामिया मोमीन यांचा मुलगा हारून मोमीन तातडीने उसाच्या शेतामध्ये आल्यावर त्यांनी पाहणी केली असता या हाडाच्या सांगाड्यावर असलेले कपडे हे वडील बाबामीया सय्यद मोमीन यांचेच असावेत असा अंदाज त्यांनी व्यक्त केला.
हाडांचा सांगाडा सापडल्याची माहिती, नारायणगाव पोलिसांना मिळाल्यावर पोलिस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. तसेच वनविभागाला देखील कळविण्यात आले. त्यानंतर तो हाडांचा सांगाडा ताब्यात घेण्यात आला असून पुढील तपासणीसाठी पाठवण्यात आला. मात्र तो सांगाडा नेमका कोणाचा ? बाबामिया सय्यद मोमीन यांचा? की आणखी कोणाचा आहे, हे सर्व तपासअंतीच स्पष्ट होऊ शकेल, असे पोलिसांनी स्प्षट केलं. निष्पन्न होऊ शकेल.
नारायणगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार यांना या घटनेची माहिती मिळताच तात्काळ त्यांनी आपली टीम घटनास्थळी पाठवली. वनविभागाचे कर्मचारी देखील घटनास्थळी दाखल झाले. यावेळी घटनास्थळी स्थानिक नागरिक व बघ्यांची गर्दी झाली होती. विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे ॲग्री सुपरवायझर घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी देखील याबाबतचा पंचनामा करून अहवाल कारखान्याचे मुख्य शेतकी अधिकारी यांना पाठवला.