भाजप नेते मुरलीधर मोहोळ यांच्या नावाने ३ कोटी रुपयांची खंडणी मागितली, नेत्याने सांगितलं नेमकं काय घडलं?
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या धमकीच्या प्रकरणानंतर आता पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या खंडणीतील प्रकाराबाबत कर्नाटक मधील व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले आहे.
पुणे : भारतीय जनता पक्षाचे नेते तथा पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांचा मोबाईल हॅक झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. यामध्ये मुरलीधर मोहोळ यांच्या मित्रांना कॉल करण्यात आले आणि त्यानंतर पैसे मागण्यात आल्याचा प्रकार समोर आला असून त्यामध्ये नुकतीच पुणे पोलिसांनी एक कारवाई केली आहे. यामध्ये दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. यामधील एक संशयित कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या सीमा रेषेवरील भागातील असल्याची माहिती समोर आली आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने ही कारवाई केली असून त्यांच्याकडून अनेक साहित्य जप्त केल्याची माहिती स्वतः मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे.
खरंतर गेल्या काही दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यालयात धमकीचा फोन प्राप्त झाला होता. त्यातमध्ये संशयित व्यक्ति कर्नाटक मधील असल्याचे समोर आले होते. त्यात आता पुन्हा मुरलीधर मोहोळ यांच्या प्रकरणातील संशयित कर्नाटक मधील असल्याने खळबळ उडाली आहे.
मुरलीधर मोहोळ यांनी याबाबत माहिती देत असतांना म्हंटलंय, दोन दिवसांपूर्वी माझा मोबाईल हॅक करून अज्ञात इसमाने माझ्या जवळच्या मित्रांकडे पैसे मागितले होते. वारंवार फोन करून पाहण्यात आले त्यानंतर माझ्याशी मित्राचा संपर्क झाला आणि सगळं समजलं.
हे सगळं केल्यानंतर माझ्या दोन व्यवसायिक मित्रांना पैसे मागितले जात आहेत असल्याचे समोर आले आहे. गुन्हे शाखेला यांची माहिती देण्यात आली त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी दोन व्यक्ती ताब्यात घेतलेले आहे त्यांचा तपास केला जात आहे.
आशा प्रकारचें गुन्हे करणारे व्यक्ती माणूस पाहत नाही, त्यामुळे काळजी घेतली पाहिजे. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या व्यक्तीना मी ओळखत नाही ते कोण आहेत माहिती नाही. यातील एक महाराष्ट्र कर्नाटक बॉण्डरीवरील असल्याची माहिती मोहोळ यांनी दिली आहे.
ज्या दोघांना ताब्यात घेण्यात आले त्यांचा पुणे पोलिस अधिक तपास करत आहेत, कारण या ताब्यात घेतलेल्या व्यक्तीकडून अनेक साहित्य जप्त करत त्यांनी अनेकांना फसवण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता आणखी कुणाची फसवणूक केली आहे? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
मुरलीधर मोहोळ यांच्या सोबत झालेल्या या प्रकारामध्ये आता पोलिसांचा तपास कोणत्या दिशेला जातो हे पाहणं महत्वाचे असेल. पण दुसरीकडे केंद्रीय नितीन गडकरी यांना धमकी देणारा कर्नाटक मधील असल्याने कर्नाटक कनेक्शन तर नाही ना? असा सवालही उपस्थित केला जात आहे.