शिवसेनेच्या माजी मंत्र्यावर बलात्काराचा गुन्हा; चाकूचा धाक दाखवून महिलेवर अत्याचार…
खंदारेने लग्नाचे आमिष दाखवून आणि चाकूचा धाक दाखवून बलात्कार केल्याचा आरोप पीडितेने केला आहे. तर खंदारे यांनी तिच्या मुलाची पूर्ण काळजी घेण्याचेही त्यावेळी वचन दिले होते.
पुणे: शिवसेना नेता आणि माजी राज्यमंत्री उत्तम प्रकाश खंदारे यांच्यावर पुण्यातील बिबवेवाडी पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील शासकीय गेस्ट हाऊसमध्ये एका महिलेवर चाकूचा धाक दाखवून बलात्कार केल्याचा त्यांच्यावर आरोप करण्यात आला आहे. तर याप्रकरणी 37 वर्षीय महिलेने बिबवेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तक्रार दिलेल्या महिलेने पोलिसांना सांगितले की, सोलापूर येथील रहिवासी उत्तम प्रकाश खंदारे (वय 65) व त्यांचा साथीदार महादेव भोसले, बंडू दशरथ गवळी यांच्याविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
त्यांच्यासह उत्तम प्रकाश खंदारे यांच्या महिला सहकाऱ्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार महिलेच्या म्हणण्यानुसार, हे प्रकरण बी रेस्ट हाऊस आणि बिबवेवाडी येथे 2012 मध्ये सुरू झाले होते आणि त्यानंतरही सुरूच राहिले होते. तब्बल 11 वर्षांनंतर पीडित महिलेने पोलिसात तक्रार दाखल केली आहे.
खंदारेने लग्नाचे आमिष दाखवून आणि चाकूचा धाक दाखवून बलात्कार केल्याचा आरोप पीडितेने केला आहे. तर खंदारे यांनी तिच्या मुलाची पूर्ण काळजी घेण्याचेही त्यावेळी वचन दिले होते.
मात्र मुलाची काळजी घेण्यासाठी त्याने दिलेला चेक बाऊन्स झाला होता. यानंतर खंदारे यांनी महिलेला जीवे मारण्याची धमकी दिली होती. खंदारे हे तत्कालीन शिवसेना-भाजप युती सरकारमध्ये सामाजिक न्याय आणि क्रीडा मंत्री होते. उत्तर सोलापूर विधानसभा मतदारसंघातून ते तीन वेळा आमदार झाले होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तम खंदारे याने लग्नाचे आमिष दाखवून पीडितेला तिच्या मुलाची पूर्ण काळजी घेण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर अशाप्रकारे खोटे आश्वासन देत पीडितेला बी रेस्ट हाऊसमध्ये बोलावण्यात आले होते.
त्यानंतर चाकूचा धाक दाखवून तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर तक्रारदार महिलेने आपली सुटका करून घेण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्यानंतर खंदारेने महिलेच्या परिस्थितीचा फायदा उठवत महिलेवर बलात्कार केला होता.