अमरावती : अमरावतीत अल्पवयीन मुलीवरील बलात्काराच्या घटनेला आता वेगळं वळण लागल्याचं दिसत आहे. कारण बलात्कार प्रकरणात अटकेत असलेल्या आरोपीने पोलीस ठाण्यातच गळफास घेत आत्महत्या केली. त्यामुळे अमरावती पोलिसात एकच खळबळ उडाली आहे. अटकेत असलेला 50 वर्षीय आरोपीने आत्महत्या का केली? याचा तपास आता पोलीस करत आहेत. खरंतर मृतक इसम हा संशयित आरोपी होता. त्याच्यावर असलेल्या आरोपांचा तपास सुरु होता. पण या सगळ्या गोष्टींना सामोरं न जाता आरोपीने गळफास घेऊन स्वत:चं आयुष्य संपवल्याने एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीचं नाव अरुण जवंजाळ असं होतं. या आरोपीने काल (23 सप्टेंबर) दुपारी 4 ते 5 वाजेच्या सुमारास अमरावती शहर आयुक्तालयाच्या वलगाव पोलीस ठाण्याच्या परिसरात गळफास घेऊन आयुष्य संपवलं. आरोपीच्या आत्महत्येमागे नेमकं कारण काय? ते अद्याप समजू शकलेलं नाही. पण बलात्काराच्या आरोपांप्रकरणी अटक झाल्याने आपली बदनामी झाली असेल. या आरोपांमुळे आपण जगाला तोंड कसं दाखवावं? या विचारातून त्याने आत्महत्या केली असेल, असा संशय पोलिसांनी वर्तवला आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
दरम्यान, आरोपीच्या आत्महत्येची माहिती मिळाल्यानंतर जिल्हा सत्र न्यायालयालयाचे न्यायाधीश, भातकुलीचे उपविभागीय अधिकारी यांनी वलगाव पोलीस ठाण्याला भेट दिली. त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा करत मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवल. या प्रकरणाचा तपास आता सीआयडी पोलीस करत आहेत.
राज्यात बलात्काराच्या घटना सातत्याने घडताना दिसत आहेत. राज्याची राजधानी असलेल्या मुबंई शहराच्या अवघ्या काही अंतरावर असलेल्या डोंबिवलीत अल्पवयीन मुलीवर 31 जणांकडून सामूहिक बलात्कार झाल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. या घटनेप्रकरणी पोलिसांनी काही आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. पण या घटनेमुळे महिला अत्याचाराच्या घटनांवर आळा घालण्यासाठी काहीतरी कठोर पाऊल उचलण्याची गरज असल्याचं अधोरेखित केलं आहे.
दुसरीकडे सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर परिसरात राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीने बाळाला जन्म दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी सागर उर्फ आबा हनुमंत गायकवाड (वय -30 वर्ष) आणि आशुतोष मोहन बिरामणे (रा. महाबळेश्वर) यांना ताब्यात घेत पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.
या दोघांना सातारा येथील जिल्हा विशेष सत्र न्यायालयाकडून 27 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तर गुरुवारी या प्रकरणात सहभागी असलेल्या आणखी 11 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये महाबळेश्वर नगरीचे माजी नगराध्यक्ष आणि शिवसेनेचे नेते डी. एम. बावळेकर यांचे दोन सुपुत्र सनी बावळेकर आणि योगेश बावळेकर यांचादेखील समावेश असल्यामुळे महाबळेश्वरमध्ये खळबळ उडाली आहे.
हेही वाचा :
दिल्ली कोर्टात फिल्मी स्टाईल थरार, वकिलाच्या वेशात गोळीबार, गँगस्टरसह चौघे ठार
डोंबिवलीत अल्पवयीन मुलीवर गँगरेप प्रकरण, आरोपींचा आकडा 33 वर, 28 जणांना बेड्या