Ratnagiri Crime : भावाला फोन करुन म्हणाली मी उद्या गावी येतेय, पण गावी पोहचलीच नाही, दोन दिवसांनी थेट…
बँक कर्मचारी असलेल्या तरुणीने भावाला फोन करुन गावी येत असल्याचे सांगितले. मात्र तरुणी गावी पोहचलीच नाही. शोध घेतला असता जे समोर आलं त्याने पायाखालची जमीनच सरकली.
कृष्णकांत साळगावकर / मनोज लेले, दापोली / 2 ऑगस्ट 2023 : रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. दापोलीहून चिपळूण येथे आपल्या गावी जाण्यासाठी निघालेल्या 24 तरुणीचा रहस्यमयरित्या मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. दापोलीतील दाभोळ खाडी परिसरात तरुणीचा मृतदेह सापडला आहे. याप्रकरणी दाभोळ पोलीस ठाण्यात सध्या आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तरुणीचा मृत्यू नेमका कसा झाला?, घातपात की आत्महत्या? याबाबत गूढ कायम आहे. दाभोळ पोलीस आणि दापोली पोलीस प्रकरणाचा तपास करत आहेत. मयत तरुणी दापोली येथे स्टेट बँकेत कंत्राटी कर्मचारी म्हणून काम करत होती.
गावी जाण्यासाठी निघाली मात्र पोहचलीच नाही
मयत तरुणी ही मूळची चिपळूण तालुक्यातील ओमळी गावची रहिवासी होती. मात्र नोकरीनिमित्त ती दापोलीत राहत होती. शनिवारी-रविवारी बँकेला सुट्टी असायची. त्यामुळे ती दोन दिवस गावी आपल्या घरी जायची. नेहमीप्रमाणे या शुक्रवारी रात्री तिने भावाला फोन करुन उद्या सकाळी गावी येत असल्याचे सांगितले. मात्र ती घरी पोहचलीच नाही. घरच्यांनी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, फोन लागत नव्हता.
अखेर घरच्यांनी दापोली पोलीस ठाण्यात धाव घेत मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. पोलिसांनी तरुणीचा शोध सुरु केला. मात्र ती कुठेही सापडली नाही. अखेर दाभोळ खाडी परिसरात तिचा मृतदेह आढळून आला. तरुणीचे शेवटचे लोकेशन खेड असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. त्यानंतर दाभोळ खाडी परिसरात मृतदेह तरंगताना आढळला.
तरुणीच्या मृत्यूचे गूढ कायम
मृतेदहाची माहिती मिळताच दाभोळ सागरी पोलीस ठाण्याच्या सहाय्यक निरीक्षक पूजा हिरेमठ, सागर कांबळे यांनी घटनास्थळी धाव घेतली. सुरवातीला आकस्मिक मृत्यूची नोंद दाभोळ पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. तरुणीने आत्महत्या केली की तिचा घातपात झाला?, कोणत्या कारणातून झाला?, तरुणीसोबत नेमकं काय घडलं? याबाबत पोलीस सखोल तपास करत आहेत. शवविच्छेदन अहवाल आणि तपासानंतरच तरुणीच्या मृत्यूचे रहस्य उलगडेल. सध्या मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.