मृत पित्याला जिवंत करण्यासाठी 2 महिन्याच्या बालकाचे अपहरण, पोलिसांच्या सतर्कतेमुळे अघोरी कृत्याचा पर्दाफाश
आरोपी तरुणीच्या वडिलांचा ऑक्टोबरमध्ये मृत्यू झाला. अंत्यसंस्कारावेळी कुणीतरी तिला मृत पित्याला पुनर्जीवन देण्यासाठी समान लिंगाच्या बाळाचा बळी देण्याचे सुचवले.
दिल्ली : भारतीय समाजात अजूनही अंधश्रद्धेची पाळेमुळे घट्ट रोवली गेली आहेत. ही अंधश्रद्धा अनेक निष्पाप बालकांच्या जीवावर बेतत आहे. अंधश्रद्धेपोटी लहान मुलांचा हकनाक बळी दिला जात आहे. काही लोक धनप्राप्तीसाठी तर काहीजण आपल्या इतर इच्छा पूर्ण करण्यासाठी निष्पाप जीवाला बळी देतात. अशीच एक क्रूर घटना सध्या उघडकीस आली आहे. एका तरुणीने हे धक्कादायक कृत्य केले आहे.
तरुणीच्या वडिलांचा ऑक्टोबरमध्ये मृत्यू
आरोपी तरुणीच्या वडिलांचा ऑक्टोबरमध्ये मृत्यू झाला. अंत्यसंस्कारावेळी कुणीतरी तिला मृत पित्याला पुनर्जीवन देण्यासाठी समान लिंगाच्या बाळाचा बळी देण्याचे सुचवले. त्यामुळे त्या तरुणीने लहान बालकांचा शोध सुरू केला होता.
नरबळी देण्यासाठी बालकाचे अपहरण
मृत पित्याला जिवंत करण्यासाठी सफदरजंग रुग्णालयातून दोन महिन्यांच्या बालकाचे अपहरण केले. अपहरण केलेल्या या मुलाचा बळी देऊन ती आपल्या वडिलांना पुनर्जीवन देण्याचा प्रयत्न करणार होती.
अवघ्या 24 तासात आरोपीच्या मुसक्या आवळल्या
बाळाच्या अपहरणाची पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली होती. निष्पाप बालकाचा अंधश्रद्धेतून बळी घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या युवतीला दिल्ली पोलिसांनी अवघ्या 24 तासांच्या आत अटक केल्याचे दक्षिण पूर्व दिल्लीच्या डीसीपी ईशा पांडे यांनी सांगितले.
10 नोव्हेंबर रोजी झाले होते अपहरण
अमर कॉलनी पोलीस ठाण्यातील पोलिसांना दिल्लीच्या गढी गावातून जवळपास दोन महिन्यांच्या बाळाचे 10 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 4 वाजता अपहरण करण्यात आल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी पुढील तपासाची चक्रे फिरवली.
कसे केले अपहरण?
पोलिसांचे एक विशेष पथक देखील तयार करण्यात आले. अपहरणकर्त्या तरुणीने तक्रारदार महिलेच्या बाळाचे रुग्णालयातून अपहरण केले होते. आरोपी तरुणीने आपण रुग्णालयातील बाळांची सांभाळ करणाऱ्या स्वयंसेवी संस्थेची सदस्य असल्याचे सांगितले होते. त्यामुळे महिलेने तिच्यावर विश्वास ठेवून आपल्या बाळाचा ताबा तिच्याकडे दिला होता.
नेमकी त्याचीच संधी साधत आरोपी तरुणीने बाळाचे अपहरण केले. महिलेला बतावणी करून बाळाला घराबाहेर नेण्याबाबत सांगितले. यावेळी तक्रारदार महिलेने भाचीला बाळ घेऊन आरोपी तरुणीसोबत जाण्यास सांगितले.
आरोपी तरुणीने बाळ आणि भाची ऋतूला एका कारमध्ये बसवले. नंतर प्रवासादरम्यान भाचीला कोल्ड्रिंकमध्ये काहीतरी मिसळून बेशुद्ध केले. नंतर त्या भाचीला कारमधून खाली ढकलले आणि बाळाचे अपहरण केले.