भ्रष्टाचार प्रकरणात भाजपचा ‘हा’ बडा नेता ईडीच्या तावडीत सापडणार ?; आरटीआय कार्यकर्त्याने केली चौकशीची मागणी
अब्राहम यांनी येडियुरप्पा यांच्यासह त्यांचा मुलगा बी.वाय. विजयेंद्र, सहकार मंत्री एस.टी. सोमशेखर व इतर सहा जणांच्या चौकशीची मागणी करीत विशेष न्यायालयात याचिका केली होती.
बंगळुरु : बिगर भाजपशासित राज्यांत ईडी आणि सीबीआयच्या धाडी टाकल्या जात असल्यामुळे मोदी सरकारवर विरोधकांकडून टीका केली जात आहे. अशातच आता भाजपचे सरकार असलेल्या राज्यातील भाजपचा बडा नेता ईडी (ED)च्या रडारवर येण्याची शक्यता आहे. कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते बी. एस. येडीयुरप्पा (B.S. Yeddyurappa) यांच्या ईडी चौकशीची मागणी करण्यात आली आहे. ज्येष्ठ वकील आणि आरटीआय कार्यकर्ते (RTI Activist) टी. जे. अब्राहम यांनी येडियुरप्पा यांच्याविरुद्धच्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाकडे (ईडी) धाव घेतली आहे.
अब्राहम यांनी येडियुरप्पा यांच्यासह त्यांचा मुलगा बी.वाय. विजयेंद्र, सहकार मंत्री एस.टी. सोमशेखर व इतर सहा जणांच्या चौकशीची मागणी करीत विशेष न्यायालयात याचिका केली होती.
खासदार, आमदार आणि उच्च न्यायालयविरोधात खटले चालवण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या विशेष न्यायालयात त्यांनी दाद मागितली होती.
विशेष न्यायालयाला पुनर्विचार करण्याचे आदेश
अब्राहम यांची याचिका विशेष न्यायालयाने फेटाळून लावली होती. त्यानंतर त्यांनी कर्नाटक उच्च न्यायालयात अपील दाखल केले. त्यावर उच्च न्यायालयाने विशेष न्यायालयाला या प्रकरणाचा पुनर्विचार करण्याचे निर्देश दिले.
विशेष न्यायाधीश पीएमएलए अंतर्गत गुन्ह्यांसाठी कार्यवाही निर्देशित करू शकत नाहीत. तक्रारदार कायद्यानुसार परवानगी असलेल्या प्रक्रियेनुसार योग्य कार्यवाही सुरू करण्यास स्वतंत्र आहे, असे अब्राहम यांनी म्हटले आहे.
सीआरपीसीच्या कलम 156(3)अ अंतर्गत चौकशीचे आदेश देण्यासाठी विशेष न्यायालयाला विनंती केल्यानंतर आपण आपली याचिका पुनर्संचयित करण्याचा प्रयत्न करू, असे अब्राहम यांनी सांगितले.
येत्या आठवड्यात रिट याचिका दाखल करणार
बी. एस. येडियुरप्पा, विजयेंद्र, शशिधर मराडी, संजय श्री, चंद्रकांता रामलिंगम, के. रवी आणि विरुपक्षप्पा यमकनमरादी यांच्या विरोधात एफआयआर नोंदवणे बंधनकारक आहे, अशी माहितीही अब्राहम यांनी दिली आहे. ते येत्या आठवड्यात उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल करणार आहेत.
येडियुरप्पा व त्यांच्या कुटुंबीयांनी लाच घेतल्याचा आरोप
येडियुरप्पा हे कर्नाटकचे मुख्यमंत्री असताना सत्तेचा गैरवापर करत त्यांनी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी बंगळुरू विकास प्राधिकरण (BDA) गृहनिर्माण प्रकल्पांचे कंत्राट देण्यासाठी रामलिंगम कन्स्ट्रक्शन कंपनीकडून शेकडो कोटींची लाच घेतल्याचा आरोप अब्राहम यांनी केला आहे.
येडियुरप्पा सध्या केंद्रीय संसदीय मंडळ आणि केंद्रीय निवडणूक समितीचे सदस्य आहेत. ही भाजपची सर्वोच्च निर्णय घेणारी संस्था आहे.
आपण राज्यात काँग्रेसला कधीही सत्तेवर येऊ देणार नाही आणि कर्नाटकात आगामी विधानसभा निवडणुकीत 150 जागा मिळवू, असे येडियुरप्पा यांनी जाहीर केले आहे.