Sangli crime News : पोलीस ठाण्याच्या आवारातून बाळ पळवलं, पण अखेर पोलिसांनी कसब दाखवलं!
Sangli Kidnapping : महिन्याभरापूर्वी सांगलीतून एका नवजात बाळाचीही चोरी करण्यात आली होती. नर्स बनून आलेल्या एका महिलेनं बाळ पळवून नेलं होतं. ही घटना ताजी असतानाच आता तर चक्क तीन वर्षांच्या बाळाचं पोलीस स्थानकाच्या आवारातून अपहरण करण्यात आल्याचं उघडकीस आलं आहे.
सांगली : पोलीस ठाण्याच्या आवारातून बाळ पळवून (kidnapping) नेल्याची घटना सांगलीतून (Sangli Crime News) उघडकीस आलीय. याप्रकरणी पोलिसांनीही (Sangli City Police) मोठ्या शिताफीने चौघांना अटक केली. विशेष म्हणजे बाळाच्या अपहरणाचा हा धक्कादायक प्रकार चक्क सांगली पोलीस ठाण्याच्या आवारात घडलाय. बाळाचं अपहरण करुन त्याला पळवून नेण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या चौघा जणांना पोलिसांनी अटकही केलीय. सध्या अटक करण्यात आलेल्या चारही जणांची पोलिसांकडून कसून चौकशी केली जाते आहे. त्यांनी नेमकं असं कृत्य का केलं, याचा शोध पोलिसांकडून घेतला जातोय. अटक करण्यात आलेले चौघेही जण बिहारचे असल्याची माहिती समोर आली आहे. चक्क पोलीस ठाण्याच्या आवारातूनच बाळाचं अपहरण करण्यात आल्यानं सांगलीत एकच खळबळ उडालीय.
पोलिसांचा धाक आहे की नाही?
सांगली शहर पोलीस ठाण्याच्या आवारातून एक तीन वर्षांचं बाळ गायब झालं होतं. बाळाला कुणीतरी पळवून नेलंय, हे लक्षात आल्यानंतर चिमुरड्याच्या आईने पोलिसांत धाव घेतली. सांगली शहर पोलिसात तीन वर्षांच्या चिमुरड्याच्या आईने तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी लगेचच या प्रकाराची गंभीर दखल घेत चौघा जणांना अठक केली. महत्त्वाचं म्हणजे सांगली पोलिसांनी साताऱ्यात जाऊन चौघांना ताब्यात घेतलं आणि मोठ्या शिताफीनं तीन वर्षांच्या बाळाची सुटका केली.
साताऱ्यातून चौघांना अटक
सातारा रेल्वे स्थानक परिसरातून चौघांना अटक करण्यात आलीय. याप्रकरणी रेशमीदेवी श्यामसुंदर रविदास, बुधन उर्फ औकात सत्येंद्र रविदास, मिथुन जय कुमार सत्येंद्रदास, बसने देवी सत्येंद्रदास यांना पोलिसांनी बेड्या ठोकल्यात. हे सर्वजण बिहार येथील राहणारे असल्याचीही माहिती चौकशीतून समोर आली आहे. वैशाली श्यामसुंदर रविदास यांनी या प्रकरणी पोलिसांत तक्रार दिली होती.
महत्त्वाचं म्हणजे महिन्याभरापूर्वी सांगलीतून एका नवजात बाळाचीही चोरी करण्यात आली होती. नर्स बनून आलेल्या एका महिलेनं बाळ पळवून नेलं होतं. ही घटना ताजी असतानाच आता तर सांगलीतून चक्क तीन वर्षांच्या बाळाचं पोलीस स्थानकाच्या आवारातून अपहरण करण्यात आल्याचं उघडकीस आलं आहे. त्यामुळे लहान मुलांच्या पालकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय. सांगलीत बाळांचं अपहरण करणारी मोठी टोळी सक्रिय असण्याचा संशय सध्या व्यक्त केला जातोय. त्या अनुशंगानेही पोलिसांकडून सध्या तपास केला जातोय.