रुमालाने तान्हुल्या बाळाला पोटाशी बांधले, 23 वर्षीय विवाहितेची विहिरीत आत्महत्या
23 वर्षीय राजश्री शंकर रासकर हिने आठ महिन्यांचा मुलगा शिवतेज शंकर रासकर याच्यासह आत्महत्या केली. दोघेही सांगली जिल्ह्यातील कडेगावमध्ये राहत होते
कराड : मावशीकडे निघालेल्या विवाहितेने आठ महिन्यांच्या बाळासह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. तान्हुल्या बाळाला पोटाला बांधून आईने आयुष्याची अखेर केली. सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यात कासार शिरंबे येथील शिवारात ही घटना घडली. (Satara Karad Mother commits Suicide with eight months old infant)
मोठ्या रुमालाने बाळाला पोटाशी बांधले
23 वर्षीय राजश्री शंकर रासकर हिने आठ महिन्यांचा मुलगा शिवतेज शंकर रासकर याच्यासह आत्महत्या केली. दोघेही सांगली जिल्ह्यातील कडेगावमध्ये राहत होते. माऊलीने लहान बाळाला मोठ्या रुमालाने पोटाबरोबर घट्ट बांधले असल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले.
मावशीच्या गावी जाऊन विहिरीत उडी
आत्महत्या केलेल्या महिलेवर मानसोपचार सुरु होते, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. कराडला दवाखान्यात जाते म्हणून घरातून ती लेकासह निघाली होती. दवाखान्यात न जाता ती कासार शिरंबे या मावशीच्या गावाला येत होती. मात्र मावशीकडे न पोहोचता तिने मुलासह विहिरीत उडी घेतली असावी, असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. या घटनेचा कराड तालुका पोलिस अधिक तपास करत आहेत.
केरळमध्ये विवाहितेची आत्महत्या
दुसरीकडे, शारीरिक अत्याचारांमुळे आपल्या शरीरावर झालेल्या जखमांचे फोटो वडिलांना पाठवत अखेर नवविवाहितेने आत्महत्या केल्याची घटना केरळमध्ये समोर आली आहे. लग्नानंतर अवघ्या तीन महिन्यात तिने आयुष्याची अखेर केली.
लग्नानंतर काही दिवसातच माहेरी
आणखी चांगली गाडी किंवा दहा लाख रुपयांची रोकड द्यावी, अशी मागणी पती किरणकुमार विस्मयाच्या माहेरच्या माणसांकडे करत होता. त्यामुळे हुंड्यापायी त्याने पत्नीला शिवीगाळ आणि मारहाण करण्यास सुरुवात केली. नवऱ्याचा त्रास इतका वाढला, की लग्नानंतर काही दिवसातच ती माहेरी येऊन आपल्या आई-वडिलांसोबत राहू लागली.
बहिणीला जखमांचे फोटो पाठवले
रविवारी रात्री विस्मयाने आपल्या बहिणीला व्हॉट्सअॅप मेसेज करुन आपली बिकट स्थिती कथन केली. शिवीगाळ करुन पती किरण कुमार आपल्यावर शारीरिक अत्याचार करत आहे, असा आरोपही तिने मेसेजमध्ये केला होता. त्यामुळे शरीरावर झालेल्या जखमांचे फोटोही तिने पाठवले.
माहेरच्या कुटुंबाकडून हत्येचा आरोप
सोमवारी सकाळी विस्मयाच्या सासारहून माहेरी फोन आला. तुमच्या मुलीला रुग्णालयात दाखल केल्याचं सांगण्यात आलं. मात्र नायर कुटुंबीय हॉस्पिटलला पोहोचताच विस्मयाने आत्महत्या केल्याचं सांगण्यात आलं. विस्मयाच्या वडिलांनी मात्र ही आत्महत्या नसून किरणकुमारनेच आपल्या मुलीची हत्या केल्याचा आरोप लावला आहे. त्यांच्या तक्रारीनुसार पोलिसांनी किरण कुमारला अटक करुन पुढील तपास सुरु केला आहे.
संबंधित बातम्या :
BMC च्या नर्सचा धावत्या ट्रेनमध्ये विनयभंग, 22 वर्षीय तरुणाला पालघरमध्ये अटक
पत्नीसोबत विवाहबाह्य संबंध, तरुणाची मुंबईला बोलावून हत्या, पतीसह चौघांना अटक
(Satara Karad Mother commits Suicide with eight months old infant)