विद्यार्थ्याने गणवेशात केले शौच, माथेफिरु शिक्षकाकडून ‘ही’ भयानक शिक्षा
कर्नाटकातील एका शाळेत घडलेल्या या घटनेवर सोशल मीडियातही तीव्र पडसाद उमटले असून अमानुष, क्रूर शिक्षकाला कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
बंगळुरू : विद्यार्थ्यांवर चांगले संस्कार घडवण्याचे शिक्षकांचे कर्तव्य. पण जेव्हा शिक्षक हे कर्तव्य विसरून स्वतःच क्रूर वागतात, तेव्हा विद्यार्थ्यांसमोर किती दहशत निर्माण होत असेल, याची प्रचिती नुकत्याच घडलेल्या एका घटनेतून आली आहे. शाळेच्या गणवेशात शौच (Toilet) केल्याच्या क्षुल्लक कारणावरून शिक्षक अत्यंत अमानुष वागला आणि त्याने चक्क दुसरी इयत्तेतील विद्यार्थ्यांच्या अंगावर गरम पाणी (Hot Water) ओतले. त्यात तो विद्यार्थी गंभीररित्या भाजला (Burned) असून या कृत्यावर प्रचंड संतापाची लाट उसळली आहे.
कर्नाटकातील एका शाळेत घडलेल्या या घटनेवर सोशल मीडियातही तीव्र पडसाद उमटले असून अमानुष, क्रूर शिक्षकाला कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
दुसरीतील चिमुकला तब्बल 40 टक्के भाजला
शिक्षकाने गरम पाणी अंगावर फेकल्यामुळे इयत्ता दुसरीत विद्यार्थी तब्बल 40 टक्के भाजला आहे. कर्नाटकातील रायचूर जिल्ह्यातील संतेकल्लूर गावात घनमठेश्वरा ग्रामीण संस्था नावाच्या प्राथमिक शाळेत गेल्या शुक्रवारी ही धक्कादायक घटना घडली.
गंभीर भाजलेल्या विद्यार्थ्याला लिंगसगुरु तालुका रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.
विद्यार्थ्याने केली ‘ही’ छोटीशी चूक
पीडित चिमुकल्याने आपल्या गणवेशात शौच केला होता. वयाने फार लहान असल्यामुळे त्याला याचा अंदाज आला नाही. मात्र विद्यार्थ्याची ही चूक समजल्यानंतर शिक्षक हुलीगेप्पाचा पारा चढला आणि त्याने रागाच्या भारत थेट मुलावर पाईपिंगचे गरम पाणी ओतले.
हा प्रकार सर्वत्र कळल्यानंतर शिक्षक चांगलाच भेदरला. त्याने घटनेची आणखी कुठे वाच्यता करू नये म्हणून पीडित मुलाच्या आईवडिलांना धमकीही दिली. या घटनेची तक्रार न करण्याची धमकी मुलाच्या कुटुंबियांना देण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.
महिला व बालकल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष
या घटनेनंतर दबावासाठी मुलाच्या पालकांना स्थानिक नेत्यांचे फोन आल्याचेही वृत्त आहे. मात्र तक्रार दाखल केल्याशिवाय संबंधित क्रूर शिक्षकावर कारवाई करता येणार नसल्याचे पोलिसांनी सांगितले.
महिला व बालकल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांनीही रुग्णालयात जाऊन मुलाची काय स्थिती आहे हे जाणून घेतलेले नाही. त्यामुळे स्थानिक नेते आणि प्रशासनाविरुद्ध संताप व्यक्त होत आहे. प्रशासनाच्या निष्क्रियतेवर सोशल मीडियात टीकेची झोड उठली आहे.
पीडित मुलाचे फोटो व्हायरल
या धक्कादायक घटनेनंतर कारवाई होणार, याची कुणकुण लागताच आरोपी शिक्षकाने शाळेत येणे बंद केले आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी अधिकाऱ्यांनी स्वत:हून भूमिका घ्यावी, अशी मागणी होत आहे.
दरम्यान, गंभीररीत्या भाजलेल्या मुलाला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असून त्या मुलाला झालेल्या गंभीर दुखापतीचे फोटो व्हायरल झाले आहेत.