Neelam Gorhe Threatened : रुपाली चाकणकरांनंतर आता नीलम गोऱ्हेंनाही जीवे मारण्याची धमकी
नीलम गोऱ्हे यांच्या पीएला फोन करुन धमकी देण्यात आली. तसेच निलम गोऱ्हे यांना ईमेलवरूनही धमकी देण्यात आली आहे. यासंदर्भात नीलम गोऱ्हे यांनी नगर पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे.
मुंबई : राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा आणि राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकरां (Rupali Chakankar)ना धमकीनंतर आता शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांनाही जीवे मारण्याची धमकी (Threatened) देण्यात आली आहे. नीलम गोऱ्हे यांच्या पीएला फोन करुन धमकी देण्यात आली. तसेच निलम गोऱ्हे यांना ईमेलवरूनही धमकी देण्यात आली आहे. यासंदर्भात नीलम गोऱ्हे यांनी नगर पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. कोल्हापूरमधील हेरवाड ग्रामपंचायतने ‘विधवा प्रथा निर्मूलन’ बाबत निषेध व्यक्त केला आहे. या माथेफिरुने महिला अध्यक्ष, स्त्री आधार केंद्र, मुख्यमंत्री, उपसभापती कार्यालय तसेच अन्य मान्यवरांना हेरवाडच्या या निर्णयाचे समर्थन करणारे कार्यक्रम न घेण्याबाबत 25 मे, 2022 एक मेल पाठविला आहे. या माथेफिरुने स्वतःच्या विधवा आईवरच बलात्कार करण्याची धमकी दिली आहे.
विधवा प्रथेसंदर्भातील निर्णयाचा निषेध
राज्यात 5 मे, 2022 रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील हेरवाड येथे ग्राम पंचायतीने विधवा प्रथेसंदर्भात क्रांतिकारी निर्णय घेतला. या निर्णयाचे राज्यातील सर्व स्तरातून स्वागत झाले. गोऱ्हे यांनी देखील हेरवाड येथे 11 मे, 2022 रोजी भेट देऊन या गावाचे अभिनंदन केले. या गावाच्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या ग्रामविकास विभागाने देखील 17 मे, 2022 रोजी एक विशेष परिपत्रक काढून सर्व ग्रामपंचायतीनी याचे अनुकरण करावे, असे आवाहन केले. स्त्री आधार केंद्र, उपसभापती कार्यालय आणि विधवा सन्मान कायदा समिती अभियान यांच्या वतीने पुणे येथे सातारा, सांगली, कोल्हापूर, अहमदनगर, पुणे, रत्नागिरी आदी जिल्ह्यातील सामाजिक संस्था आणि सामाजिक कार्यकर्ते यांची एक ‘परिवर्तन बैठक’ 27 मे, 2022 रोजी आयोजित करण्यात आली होती.या बैठकीची आयोजनाची बातमी प्रसारित झाल्यावर अहमदनगर जिल्ह्यातील एका माथेफिरू व्यक्तीने मुख्यमंत्री, उपसभापती कार्यालय , स्त्री आधार केंद्र तसेच अन्य मान्यवरांना हेरवाडच्या या निर्णयाचे समर्थन करणारे कार्यक्रम न घेण्याबाबत 25 मे रोजी एक मेल पाठविला.
माथेफिरु विरोधात योग्य कारवाई करण्याचे आश्वासन
याबाबत सदर व्यक्तीला ताब्यात घेऊन योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन पोलीस अधीक्षकांनी दिले आहे. याबाबत पोलिसांकडे लेखी तक्रार दखल करून अशा विकृत मनोवृत्तीच्या लोकांना वेळीच रोखण्याबाबत योग्य ती कारवाई करण्याबाबत विनंती करण्यात येणार आहे, अशी माहिती विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिली. (Shiv Sena leader Neelam Gorhe threatened to kill over phone)