श्रद्धा हत्यांकड : तिसऱ्या व्यक्तीने केली आफताबला पुरावे मिटवण्यासाठी मदत, कोणंय तो?
आज पुन्हा होणार आफताब पुनावाल याची पॉलिग्राफ टेस्ट! पण त्याआधी समोर आली महत्त्वाची माहिती
दिल्ली : श्रद्धा वालकर हत्याकांड प्रकरणी एक महत्त्वपूर्ण खुलासा पोलिसांकडून लवकरच केला जाण्याची शक्यताय. श्रद्धा हत्याकांड प्रकरणात आता तिसऱ्या व्यक्तीची इन्ट्री झालीय. ही तिसरी व्यक्ती कोण आहे, याचं गूढ वाढलंय. विशेष म्हणजे या व्यक्तीनेच आफताब पुनावाला याला हत्येचे पुरावे मिटवून टाकण्यासाठी मदत केली असल्याचा दाट संशय व्यक्त केला जातोय. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्ली पोलिसांच्या तपासातून या तिसऱ्या व्यक्तीबाबत लवकरच मोठा गौप्यस्फोट केला जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, आतापर्यंत तीन वेळा आफताब पुनावाला याची पॉलिग्राफ टेस्ट झालीय. आता आज पुन्हा त्याची पॉलिग्राफ टेस्ट केली जाणार आहे.
श्रद्धा हत्याकांड प्रकरणाचं गूढ अजूनही कायम आहे. दिवसेंदिवस या हत्याकांड प्रकरणाशी संबंधित नवनवे खुलासे समोर येत आहेत. अशातच आता तिसऱ्या व्यक्तीचं नाव या हत्याकांडाशी जोडलं जाण्याची शक्यता वर्तवण्यात आल्यानं ही व्यक्ती कोण आहे? या व्यक्तीने आफताब पुनावाला याला मदत का केली? असेही प्रश्न उपस्थित होत आहेत.
आफताब अमीन पुनावाला हा सध्या तिहार जेलच्या सेल नंबर 4 मध्ये कैदेत आहे. आज पुन्हा एकदा केल्या जाणाऱ्या त्याच्या पॉलिग्राफ टेस्टकडेही सगळ्यांचं लक्ष लागलंय. दिल्लीतील रोहिणी येथील एफएसएलमध्ये आज पॉलिग्राफ टेस्ट होणार आहे.
आतापर्यंत झालेल्या तीन पॉलिग्राफ टेस्टमध्ये आफताब पुनावाला याने पोलिासांना गंडवल्याचं बोललं जातंय. या टेस्टमधून ठोस काहीच पोलिसांच्या हाती लागलेलं नाही.
आतापर्यंत आफताब पुनावाला याना 40 प्रश्न विचारुन झाले आहेत. एकूण 70 प्रश्न त्याला विचारले जाणार आहे. पॉलिग्राफ टेस्ट दरम्यान, त्याने अनेक प्रश्नांची उत्तर देणं टाळलं. तर काही प्रश्नांची उत्तरं देण्याऐवजी तो हसत राहिला होता. आता पॉलिग्राफ टेस्ट पूर्ण झाल्यानंतर 5 डिसेंबरला आफताब पुनावाला याची नार्को टेस्टही होणार आहे.
त्या मुलीचीही चौकशी!
श्रद्धाच्या हत्येनंतर आफताब पुनावाला याने एका डॉक्टर मुलीला घरी बोलावलं होतं. या मुलीशीही तो डेटिंग ऍपवर भेटला होता. सायकॉलॉजीस्ट असलेल्या या मुलीचीही पोलिसांनी चौकशी केली आहे. बम्बल ऍपद्वारे भेटलेल्या या मुलीच्या चौकशीतून नेमकं पोलिसांच्या हाती काय लागलं, हे कळू शकलेलं नाही.
काय प्रकरण?
आफताब पुनावाला याच्यावर त्याची लिव-इन पार्टनर श्रद्धा वालकर हिचा खून केल्याचा आरोप आहे. श्रद्धा वालकर हिची गळा दाबून हत्या केल्यानंतर आफताब याने तिच्या शरीराचे तब्बल 35 तुकडे केले होते. त्यानेतर हेच तुकडे त्याने वेगवेगळ्या ठिकाणी फेकून देत हत्या केल्याचे पुरावे मिटवले होते. दरम्यान, मे महिन्यात झालेल्या या हत्याकांड प्रकरणानंतर थेट सहा महिन्यांनी म्हणजेच नोव्हेंबर महिन्यात आफताब याला अटक करण्यात आली होती.