Washim Crime : सामाजिक कार्यकर्त्यावर भररस्त्यात प्राणघातक हल्ला, घटना सीसीटीव्हीत कैद
जुना वाद उफाळून आला आणि भररस्त्यात राडा झाला. सामाजिक कार्यकर्त्यावर झालेल्या हल्ल्याने शहरात एकच खळबळ उडाली.
वाशिम / 1 ऑगस्ट 2023 : जुन्या वादातून सामाजिक कार्यकर्त्यावर भररस्त्यात जीवघेणा हल्ला केल्याची घटना वाशिम जिल्ह्यातील कारंजा शहरात घडली आहे. सलीम तेली असे हल्ला झालेल्या सामाजिक कार्यकर्त्याचे नाव आहे. या हल्ल्यात तेली हे गंभीर जखमी झाले आहेत. तेली यांना उपचारासाठी अकोला येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. कारंजा शहरातील झांशी राणी चौकात एका हॉटेलसमोर हल्ल्याची ही घटना घडली. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. याप्रकरणी कारंजा शहर पोलीस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. पोलीस घटनेचा पुढील तपास करत आहेत.
हल्ल्यात सलीम तेली गंभीर जखमी
सलीम तेली कारंजा शहरातील सामाजिक कार्यकर्ते आहेत. तेली यांचा काही लोकांसोबत जुना वाद होता. याच वादातून शहरातील झांशी राणी चौकात एका हॉटेलसमोर तेली यांना गाठून 3 ते 4 जणांनी त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. घटनेची माहिती मिळताच कारंजा शहर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत घटनास्थळाचा पंचनामा केला. गंभीर जखमी सलीम तेली यांना तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले. त्यांच्यावर सध्या उपचार सुरु आहेत.
पोलिसांकडून हल्ल्याचा सखोल तपास सुरु
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित दादा गटाचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष युसुफ पुंजानी आणि तत्कालीन मुख्याधिकारी दादाराव डोल्हारकर यांच्यावर जीवघेणा हल्ल्याचा कट रचल्याचा आरोप तेली यांनी केला आहे. मात्र कारंजा शहर पोलीस याप्रकरणी सखोल तपास करत आहेत. घटनास्थळावरील सीसीटीव्हीच्या आधारे पोलीस पुढील तपास करत आहेत. नक्की कुणी आणि कोणत्या कारणातून हल्ला केला, हे तपासाअंतीच स्पष्ट होईल.