दीड वर्षांच्या चिमुकलीच्या मृत्यूचं गूढ उलगडलं, आजोबा-काकीला हत्येप्रकरणी अटक
चिमुकलीच्या सख्ख्या आजोबांनी आपल्या दुसऱ्या सुनेच्या मदतीने कोवळ्या नातीचा जीव घेतल्याचे प्राथमिक तपासात पुढे आले आहे
पंढरपूर : घरासमोर खेळत असताना बेपत्ता झालेल्या दीड वर्षांच्या चिमुकलीच्या मृत्यूचं गूढ उलगडलं आहे. दिव्यांग मुलीचा आजोबा आणि काकीनेच खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सोलापूर जिल्ह्यात सांगोला तालुक्यातील हलदहिवडी येथे हा प्रकार घडला. या प्रकरणी आजोबा आणि चुलतीला पोलिसांनी अटक केली आहे. (Solapur Sangola Baby Girl killed by Grand father and Aunt)
घरासमोर खेळताना चिमुरडी बेपत्ता
हलदहिवडी येथील अमोल फाळके यांची जान्हवी नावाची दीड वर्षांची दिव्यांग मुलगी 6 जून रोजी बेपत्ता झाली होती. घराच्या अंगणात खेळत असताना सकाळी 8 वाजताच ती अचानक गायब झाली होती. त्याच दिवशी सायंकाळी जान्हवीचा मृतदेह घरापासून एक किलोमीटर अंतरावर एका खड्ड्यातील पाण्यात तरंगताना दिसून आला होता.
चिमुकलीच्या आजोबा-काकीला अटक
पोलिसांनी तपास करुन अवघ्या काही दिवसात आरोपींच्या हातात बेड्या ठोकल्या आहेत. यामध्ये जान्हवीच्या सख्ख्या आजोबांनी आपल्या दुसऱ्या सुनेच्या मदतीने कोवळ्या नातीचा जीव घेतल्याचे प्राथमिक तपासात पुढे आले आहे. परंतु हा खून कोणत्या कारणासाठी केला हे मात्र अजून स्पष्ट झाले नाही.
मामीकडून भाच्याची हत्या
दरम्यान, मामी आणि चुलत मामाला आक्षेपार्ह अवस्थेत पाहिल्याने दहा वर्षांच्या भाच्याला नुकताच जीव गमवावा लागला होता. विवाहबाह्य संबंध उघड होण्याच्या भीतीने मामीने बालकाची निर्घृण हत्या केली होती. झारखंडमधील गोड्डा जिल्ह्यात काही महिन्यांपूर्वी हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
दहा वर्षांचा चिमुकला आपल्या आजीच्या घरी राहायला आला होता. तिथे त्याने आपल्या मामीला तिच्या प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत पाहिले. तिचा प्रियकर म्हणजे दुसरा-तिसरा कोणी नाही, तिच्या पतीचा चुलतभाऊ होता. भाचा आपल्या संबंधांविषयी आपला पती आणि इतर नातेवाईकांना सांगेल, अशी भीती मामीला सतावत होती. त्यामुळे दोघांनी भाच्याचा काटा कायमस्वरुपी काढण्याचा निर्णय घेतला.
संबंधित बातम्या :
पोलीस स्टेशनसमोरच चालकाचा ट्रकला गळफास, चोरीचा गुन्हा नोंदवल्यानंतर आत्महत्या
(Solapur Sangola Baby Girl killed by Grand father and Aunt)