दारूडे वडील आणि आईच्या रोजच्या भांडणाला कंटाळला मुलगा, उचलले टोकाचे पाऊल
काळजाचा थरकाप उडवणारी ही दुर्दैवी घटना मेरठमधील आहे. आई-वडिलांच्या भांडणाला कंटाळल्याने मुलाने हे कृत्य केल्याचे पोलिसांनी सांगितले.
मेरठ : मेरठच्या पॉश कॉलनीत एका जोडप्याची हत्या (couple killed) झाल्याने खळबळ माजली आहे. या खुनाचा खुलासा पोलिसांनी केला आहे. खून करणारा दुसरा कोणी नसून मृत दाम्पत्याचा एकुलता एक मुलगा (son killed parents) असल्याचे निष्पन्न झाले. घरातील आई-वडिलांची भांडणे आणि घरगुती त्रासाला कंटाळून मुलाने मित्रासोबत दारू पिऊन वडिलांच्या हत्येचा कट रचला. मात्र हत्येची अंमलबजावणी सुरू असताना आईलाही जाग आल्याने मुलाने तिचीही हत्या केली. सध्या पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे.
हृदय पिळवटून टाकणारी ही घटना मेरठच्या नौचंडी पोलीस स्टेशन परिसरातील शास्त्री नगरमधील आहे. जिथे सोमवारी रात्री झोपलेल्या दाम्पत्याचा खून करण्यात आला. घरात मृतदेह आढळून आल्याने शेजाऱ्यांनी पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर एडीजीसह अनेक पोलिसांचा फौजफाटा घटनास्थळी पोहोचला. पोलिसांनी तपासासाठी फॉरेन्सिक आणि सर्व्हेलन्स टीम सक्रिय केली. याप्रकरणी पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले तसेच मृत दांपत्याच्या मुलाचीही चौकशी केली असता धक्कादायक वास्तव समोर आले. पोलिसांनी मंगळवारी रात्री उशिरा मृत व्यक्तीचा मुलगा आर्यन आणि त्याच्या मित्राला अटक केली.
रोजच्या भांडणाला कंटाळल्याने केले कृत्य
एसएसपी मेरठ रोहित सजवान यांनी दिलेल्या माहितीनुसार, चौकशीदरम्यान आरोपीने सांगितले की, आई-वडिलांच्या रोजच्या भांडणामुळे घरातील वातावरण बिघडले होते. मद्यधुंद बाप अनेकदा दारूच्या नशेत आईला मारहाण करत असे. याचा राग येऊन त्याने वडिलांच्या हत्येचा कट रचला. ही घटना घडवून आणण्यासाठी त्याने आपल्या मित्रालाही खुनात सहभागी करून घेतले. नंतर नियोजनाचा भाग म्हणून वडिलांना आधी गुंगीचे औषध घातलेला मँगो शेक प्यायला दिला. त्यानंतर रात्री उशिरा घरी परत येऊन वडिलांची हत्या केली. मात्र यादरम्यान बेडवर झोपलेली आईही जागी झाली. आणि तिने वडिलांना मारण्यास विरोध केला. त्यामुळे त्या मुलाने आपल्या आईचाही जीव घेतला.
हत्येनंतर पोलिसांपासून वाचण्यासाठी आरोपी आर्यन आणि त्याचा मित्र घटनास्थळावरून पळून गेले. या दुहेरी हत्याकांडाचा दिवसभर तपास केल्यानंतर पोलिसांनी रात्री उशिरा दोघांनाही अटक केली असून, आता दोघांनाही कारागृहात पाठवण्याची तयारी पोलिसांकडून सुरू आहे.