सून माहेरी गेली होती, सकाळी नातेवाईक सासऱ्यांना पहायला आले तर समोरील दृश्य पाहून धक्काच बसला !
संपत्तीसाठी पोटची मुलंही कोणत्या थराला जातील याचा नेम नाही. जन्मदात्यांच्या जीवावर उठायलाही मागे पुढे पाहत नाहीत. अशीच एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
फिरोजाबाद : संपत्ती आणि पैशांसाठी माणसाला नात्यांचाही विसर पडतो. संपत्तीसाठी रक्ताची नातीही एकमेकांच्या जीवावर उठतात. अशीच एक घटना उत्तर प्रदेशात उघडकीस आली आहे. जमिनीसाठी मुलाने आपल्या पित्याची हत्या केल्याची घटना फिरोजाबादमध्ये उघडकीस आली आहे. या घटनेमुळे गावात एकच खळबळ माजली आहे. दीनदयाल असे मयत वृद्धाचे नाव आहे. याप्रकरणी पत्नीच्या फिर्यादीवरुन आरोपी पतीसह त्याच्या साथीदाराला अटक केली आहे. घरी कुणी नसल्याची संधी साधत आरोपीने पित्याचा काटा काटला. पण पत्नीने गुन्ह्याची शिक्षा मिळवून दिली. दीपक असे आरोपीचे नाव आहे.
जमिनीच्या वादातून मुलाने बापाला संपवले
आरोपी दिपकचे वडिलांसोबत 25 एकर जमिनीवरुन वाद सुरु होते. मुलगा वाईट संगतीत असल्याने वडिल जमिन त्याच्या नावावर करुन देत नव्हते. यावरुन पिता-पुत्रांमध्ये दररोज वाद व्हायचे. पिता-पुत्राचे अजिबात पटत नव्हते. याच वादातून मुलाने वडिलांना संपवले.
घरी कुणी नसताना मित्राच्या मदतीने हत्या
पत्नी माहेरी गेल्यानंतर घरात कुणी नसल्याची संधी साधत दिपकने मित्राच्या मदतीने वडिलांची सोमवारी रात्री हत्या केली. सकाळी नातेवाईक घरी गेले असता त्यांना दीनदयाल मृतावस्थेत आढळला. नातेवाईकांनी हत्येचा संशय आला. नातेवाईक आणि गावकऱ्यांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवला.
पत्नीने दिली पतीच्या कारनाम्याची पोलिसांना माहिती
सुनेला सासऱ्याच्या मृत्यूची बातमी कळताच ती माहेरुन घरी आली. तिने तात्काळ पोलीस ठाणे गाठले आणि आपल्या पतीविरोधात तक्रार दाखल केली. पत्नीच्या फिर्यादीवरुन पोलिसांनी दिपक आणि त्याच्या साथीदाराला ताब्यात घेत चौकशी केली. चौकशीत आरोपीने वडिलांच्या हत्येची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी आरोपीविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करत दोघा आरोपींना अटक केली आहे.